जिल्हाधिकार्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा
अलिबाग : जिमाका
आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 4) जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहाय्यक निवडणूक अधिकारी, तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी वैशाली माने (निवडणूक), रवींद्र मठपती (रोहयो), जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे (भूसंपादन मेट्रो सेंटर-1 पनवेल), अश्विनी पाटील (भूसंपादन मेट्रो सेंटर-1 उरण) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाडुरंग शेळके आदी सर्व अधिकारी, तहसीलदार व निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मतदार यादी अद्ययावतीकरण, तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याचा आढावा घेण्यात आला. निवडणूकविषयक कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.