मोहोपाडा : वार्ताहर
चौक परिसरातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून या आहारामुळे काही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही विद्यार्थ्यांना जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. हा प्रकार तुपगाव ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर व तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव यांनी शालेय पोषण आहाराची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्यांना कळवून प्रकार उघडकीस आणला आहे. या वेळी जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांनी पाहणी करून सदर आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना देवू नये, अशा सूचना केल्या.
तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील वाघे या विद्यार्थ्यांला जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने त्याची आई सरिता वाघे हिने शाळेतून दिल्या जाणार्या जेवणाची तपासणी केली. तिला जेवणातील कडधान्यात लहान आळ्या दिसून आल्या. त्यांनी सदर प्रकार ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर यांना सांगितला. शिवाय शालेय शिक्षकांनाही याबाबत वाघे यांनी सांगितले होते. या वेळी ठोसर यांनी हा प्रकार गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितला. या वेळी जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख देविदास पाडवी, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोल यांनी तुपगाव राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण आहाराची पाहणी केली असता त्यांना कडधान्याला किड लागून आळ्या, लहान पाखरे पडल्याचे दिसून आले, तर काही आहाराची तारीख संपून 2017, 2018 सालची असल्याचे दिसून आला. संबंधितांनी मुख्याध्यापिका सौ. मलबारी यांना विचारणा करून सदर आहार विद्यार्थ्यांना देऊ नये, अशी सूचना करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. तुपगाव ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते सोपान अपटेकर व विद्यार्थ्यांचे पालक या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.