उरण : रामप्रहर वृत्त
काही दिवसांपूर्वी उरणमधील ओएनजीसीतील एका प्लांटला लागलेल्या आगीत पाच जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना, ओएनजीसीच्या एका प्लांटमधून नाफ्ता गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटजवळील गावातील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे. ओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाली. ही गळती वाढत जाऊन नाफ्ता परिसरातील नाल्यांमधून वाहू लागला आहे. आगीची घटना ताजी असल्यामुळे पुन्हा गळती झाल्याने परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जवळचे गाव लगेचच रिकामे केले. त्याचबरोबर ओएनजीसी प्लांटच्या आजूबाजूचे सर्व मार्गही रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले. याचा कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी तातडीने नाफ्ता पुरवठा करणारी पाईपलाइन बंद करण्यात आली आहे.