मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी प्रमुख नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाने शनिवारी
(दि. 19) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भरपावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवून दिले होते. प्रारंभी सर्वच उमेदवारांचा धिम्या गतीने प्रचार सुरू होता, मात्र मतदानाला तीन-चार दिवस राहिल्यानंतर प्रचाराने वेग घेतला. छोट्या प्रचारसभा, चौकसभा, मोठ्या सभा, रोड शो, रॅली, पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीगाठींवर सर्वच उमेदवारांनी जोर दिला. बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना आपल्या मतदारसंघात आणून अनेक उमेदवारांनी वातावरण ढवळून काढले. प्रचाराच्या शेवटच्याही दिवशी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करीत सर्वच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असूनही नेते आणि उमेदवारांनी पावसाची तमा न बाळगता प्रचार सुरूच ठेवला.