पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा सदस्य, सिडको अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या पनवेल मतदारसंघात प्रचंड विकासकामे केली आहेत. त्यामुळे विकास हाच आमचा प्रचाराचा अजेंडा असून, याच जोरावर ते एक लाख मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी व्यक्त केला. ते विशेष मुलाखतीत बोलत होते.
देशमुख पुढे म्हणाले, पनवेल हे ‘डेव्हलपमेंट पोटेन्शियल’ असलेले शहर आहे. पनवेलच्या आजूबाजूला इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात आहे. जेएनपीटी बंदर शेजारी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो असे प्रकल्प येथे साकारत आहेत. अशा वेळी पनवेलचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सदैव आग्रही असतात. स्थानिक विकास निधी, शासनाचा निधी, जिल्हा वार्षिक नियोजन मंंडळ, सिडको, महापालिका यांच्या योगदानातून त्यांनी पनवेल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. महापालिका आणण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.
पाणी समस्येवर बोलताना देशमुख म्हणाले की, पनवेलला पाण्याचे स्रोत कमी आहेत. देहरंग धरण तसेच एमजेपी, एमआयडीसी, सिडको यांच्याकडून पनवेलला पाणीपुरवठा होतो. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ती लक्षात घेता 408 कोटींची अमृत योजना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतली. या कामाचे टेंडरही निघाले आहे, परंतु आचारसंहितेमुळे ते सुरू होऊ शकले नाही. निवडणूक संपल्यावर हे काम सुरू होईल. याबरोबरच कोंढाणे धरण पुनर्जीवित करून हे पाणी पनवेल महापालिकेला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बाळगंगा धरणाचे पाण्याचेही नियोजन केले जात आहे. महापालिका बाल्यावस्थेत आहे. संपूर्ण गरजा भागविण्यासाठी सध्या तयारी नसली तरी नियोजनाची दिशा ठरली आहे. त्याचे दृश्य परिणाम लवकरच दिसतील. पनवेल शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष असल्यापासूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे उड्डाणपूल मागितला. या उड्डाणपुलामुळे वाहतूक समस्या काही प्रमाणात सुटली. पनवेल परिसरात प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली वाहने आणि स्वयंशिस्त नसल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. ती सोडविणे वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे, पण त्यांच्याकडेही आवश्यक मनुष्यबळ नाही. या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा मार्ग दुतर्फी होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याचे चौपदरीकरण करून घेतले. काळुंद्रे नदीवर अतिरिक्त पूल मंजूर करून घेतला. त्यामुळे पंचमुखी हनुमान मंदिरजवळची वाहतूक समस्या सुटली, असे सांगून देशमुख म्हणाले की, पनवेल महापालिकेचे प्रथम महापौर सुधाकर शिंदे यांची चुकीची धोरणे व एककल्ली कारभारामुळे येथील विकासाला अडथळा निर्माण झाला होता. त्यांनी नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ची टिमकी वाजवून वर्तमानपत्रांत फोटो छापून आणायचा कार्यक्रम राबविला. अखेर त्यांची गच्छंती झाली आणि स्थिती सुधारली. आताचे आयुक्त गणेश देशमुख समन्वयाने काम करीत आहेत.
सिडको प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर देशमुख यांनी सांगितले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आम्ही सारी मंडळी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 1984पासून आंदोलन करीत आलो आहोत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने सिडकोला प्रकल्पग्रस्त अध्यक्ष मिळालाय. त्यांना प्रश्नांची जाणीव आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी त्यांनी दिशाही पकडली आहे. ठाकूर पिता-पुत्रांची काम करण्याची पद्धत पाहून बरेच विरोधकही त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. केलेल्या विकासकामांच्या जोरावर पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाख मतांची आघाडी मिळेल. त्यांच्या विजयासाठी मित्रपक्षही जोमाने कामाला लागले आहेत. खासदार श्रीरंग बारणे स्वत: प्रचारात सहभागी होत आहेत. नुकतीच खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या सभेचा चांगला परिणाम पनवेलमध्ये होईल, असेही शेवटी देशमुख यांनी नमूद केले.