पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक दृष्टी दिनानिमित्त दृष्टी दोषांवर आधुनिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिटयूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये मोफत डोळे तपासणी अभियानाचा उपक्रम राबविला असून कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेतील मुलांची ने-आण करणार्या बसचालकांसाठी शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी पनवेल येथे एक विशेष डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 10 बस चालकांनी भाग घेतला होता. या आधी पनवेल येथील डीएवी शाळेतील 30 बसचालकांची तसेच न्यू होरायझोन स्कूलमधील वाहनचालक, पुरुष वाहक व महिला वाहक अशा 50 जणांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली होती, तसेच ज्या चालकांना चष्मा लागला असेल तर त्यांना मोफत चष्मांचे वाटपही केले जाणार असल्याची माहिती लक्ष्मी आय इन्स्टिट्युटचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन भूमकर यांनी दिली. वाहन चालविताना सर्वात जास्त डोळ्यांचा वापर होत असतो, हे ध्यानी घेऊन डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे असल्याने वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम लक्ष्मी आय इन्स्टिट्युटने हाती घेतला असून ओप्टिमेट्री काउंसिल ऑफ इंडियाच्या मदतीने या महिन्यात हे अभियान राबविले जात असून एकूण 100 जणांची मोफत डोळे तपासणी होणार आहे.