उरण ः वार्ताहर
दिवाळीच्या सणाला थोडेच दिवस राहिल्याने वेताच्या पट्या व फायबरपासून तयार केलेली आकाश कंदील बाजारात आली आहेत. ते बनविणारे गरीब कारागीर आंध्र प्रदेशमधून नागराज डी. व त्यांची पत्नी लता नागराज डी. असा परिवार आले आसून आठ इंचापासून आडीच फुटापर्यंत आकाश कंदील ते बनवत आहेत. सहा तास मेहनत करुन बनविलेले कंदील आडीचशे रुपयांपासून सोळाशे रुपयांना मिळत आहेत. या गरीब कारागिरांच्या कारागिरीला उरणकर भरभरुन दाद देत आहेत. दिव्यांचा व आतषबाजीचा दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाजारपेठाही सजू लागल्या आहेत. दिवाळीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरासमोर गच्चीमध्ये लटकणारे आकाश कंदील. बांबूच्या चिपा वापरून त्यावर रंगीत कागद चिपकवून आकाश कंदील बनविण्यात पूर्वी आनंद वाटायचा. परंतु जसजसा काळ सरकला तसा रेडीमेड पुठ्ठ्यांची नंतर प्लास्टीकचे आकाश कंदील लोक वापरु लागली. परंतु आता बांबूच्या चिपा व रबरी वायरचा वापर करुन बनविलेली आकाश कंदील उरणच्या बाजारात आली आहेत. उरणमध्ये आंध्र प्रदेशातून कारागीर आले आहेत. ते मोरा-उरण रस्त्याच्याकडेला बसून हे आकाश कंदील गेले महिनाभर तयार करत आहेत. बांबूच्या चिपांपासून पहिल्यांदा हवा त्या आकाराचा कंदील बनवून नंतर त्यावर रंगबेरंगी रबरी वायर गुंडाळून रंगीत साज चढविण्यात येत आहे. त्यामुळे ते आकाश कंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यातील राष्ट्रध्वजाच्या रंगासारखा तिरंगी कंदीलांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. आठ इंचापासून ते आडीच फुटांपर्यंत आकाश कंदील त्यांच्याजवळ आहेत. तर दोन फुटांपासून चार फुटांपर्यंत फुलदाण्याही आहेत. हे कलात्मक आकाश कंदील हस्तकलेचा एक सुंदरर नमुना असून आठ इंचाचा एक आकाश कंदील तयार करायला तीन तास वेळ लागतो तर आडीच फूट आकाश कंदील तयार करायला पाच ते सहा तास लागतात. त्यामानाने त्यांच्या किमती या कमी असून त्याच्या आकारमानानुसार व डिझाईननुसार वेगवेगळ्या आहेत. पंरतु त्यासाठी लागणारे साहित्य मेहनतीचा हिशोब केला तर ही किमत काहीच नाही. त्यामुळे त्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.