पंचनामे त्वरित करण्याची मागणी
मुरुड ः प्रतिनिधी
मुरुड तालुक्यातील खारआंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेल्या पिकाला कोंब आल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुरुड कृषी खात्यात अनेक शेतकरी पंचनामे करा, अशी मागणी करीत आहेत. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी खारआंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे. खारआंबोली परिसरातील जोसरंजन, उंडरगाव, खतिबखार या परिसरात भाताची कापणी होऊन भाताला पाण्यात भिजल्याने मोड येऊन रोपे तयार झाली आहेत. शेतकरी दुःखात असतानाही कृषी खात्याचे कोणतेही अधिकारी न फिरकल्याने शेतकर्यांच्या भावना संतप्त आहेत. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुरूड तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन पडते. सायंकाळी मात्र अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वार्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परतीच्या पावसाचा भातशेतीवर मात्र चांगलाच परिणाम झाला आहे.
मुरुड तालुक्यातील 72 गावांतील परिस्थतीची आम्ही पहाणी केली असून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात आला आहे. तहसीलदार यांच्याकडून आदेश प्राप्त होताच त्वरित पंचनामे केले जातील.
-सुरज नामदास, तालुका कृषी अधिकारी