मुरुड ः प्रतिनिधी
आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दिवाळी सण साजरा करणे गोरगरिबांना शक्य होत नाही. कष्टकरी वनवासी मंडळी सणाला गोडधोड करू शकत नाहीत. आपल्याच बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही विहिंपतर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळीच्या दिवशी मुरुडपासून 2 कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याच्या आदिवासी वाडीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे 45 कुटुबीयांना चकली, करंजी, लाडू आदी फराळाचे वाटप करण्यात आले. या वाडीवर हा उपक्रम गेली तीन तपे अव्याहतपणे सुरू आहे. या वेळी विहिंपचे मुरूड तालुका प्रखंडप्रमुख दिलीप दांडेकर, सुनील विरकुड, राजाराम ठाकूर, मुरुड तालुका संघचालक दिलीप जोशी, उमेश भायदे, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. या आदीवासी वाडीवर अंगणवाडी व जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ते 4पर्यंत शाळा आहे.