Breaking News

थळ गुरचरण जागेतील कोळी बांधवांची खळी जमीनदोस्त

अलिबाग : प्रतिनिधी

थळ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या गुरुचरण जागेत कोळी बांधवांनी मच्छी सुकविण्यासाठी तयार केलेली खळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रामपंचायतीने गुरुवारी (दि 19) जमीनदोस्त केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थळ ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी सर्व्हे नंबर 345/1 ही साडे पाच हेक्टर जामीन आहे. ही  जमीन  गुरुचरण म्हणून आरक्षित आहे. या जागेवर थळमधील कोळी बांधवांनी मच्छी सुकविण्याची  अनधिकृतपणे मातीची आणि सिमेंटची खळी तयार केली होती. याबाबत सचिन कदम यांनी गुरुचरण जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत लोकपाल यांच्याकडे 2016 साली तक्रार केली होती. त्यानुसार लोकपाल यांनी अनधिकृत केलेले बांधकाम काढून टाकण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले होते. याबाबत कोळी बांधव उच्च न्यायालयात गेले होते. मात्र उच्च न्यायालयानेही कोळी बांधवांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे कोळी बांधवांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिस्तरीय खंडपीठाने 24 जानेवारी 2020 रोजी अनधिकृत जागेवर केलेले बांधकाम व शेड पाडण्याचे आदेश दिले होते. यावेळी कोळी बांधवांचे प्रतिनिधी मदन कोळी व प्रवीण तांडेल यांनी आम्ही सिमेंट खळी व झोपडी तोडू असे न्यायालयात सांगितले होते. तीन महिन्यात हे बांधकाम स्वतःहून न तोडल्यास पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. थळ ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खळी बांधणार्‍या कोळी बांधवांना नोटीस दिल्या होत्या. मात्र तीन महिन्यात कोळी बांधवांनी आपली खळी निष्काषित न केल्याने अखेर ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी, भू-करमापक, तहसील कार्यालय कर्मचारी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घेऊन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम व सिमेंट खळी पाडली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply