खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गाव आणि पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी या दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साडेनऊ कोटींचा निधी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने होत आले तरीही अद्याप या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही कामांना सुरुवात झाली नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील दोन रस्त्यांसाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने ऑगस्ट महिन्यात निधी मंजूर केला आहे. त्यात ताकई फाटा ते ताकई गावापर्यंत रस्त्याचे सिमेंट-काँक्रीटीकरण तसेच आधुनिक लाइट व्यवस्थेसाठी चार कोटी 80 लाख आणि खोपोली शहरातील पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी हिंदी शाळेपर्यंत डीपी रस्त्याचे दोन लेनमध्ये रूपांतर, काँक्रीटीकरण व मधोमध दुभाजक टाकून आधुनिक दिवाबत्ती व्यवस्था आदी कामांसाठी चार कोटी 70 लाख असा एकूण नऊ कोटी 50 लाखांच्या निधीचा समावेश आहे. निधी मंजूर झाल्यावर दोन्ही ठिकाणच्या स्थानिक नगरसेवकांनी कामाचे श्रेय लाटण्यासाठी मोठमोठे शुभेच्छा फलक लावून प्रसिद्धीही मिळवून घेतली होती, मात्र हा निधी मंजूर असूनही कामांना प्रारंभ होत नसल्याने नागरिकांना खड्ड्यांनी भरलेल्या व अत्यंत असुरक्षित बनलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे.
ऑगस्ट महिन्यात रस्त्याच्या कामांना निधी मंजूर झाल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी मोठमोठे जाहिरात फलक लावून प्रसिद्धीही मिळविली होती. या सार्या घडामोडीला चार महिने होत आहेत. तरीही अद्याप कोणत्याही कामांना सुरुवात झालेली नाही व कधी सुरुवात होईल याबाबत नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी काहीही बोलत नाहीत. नागरिकांना मात्र रोज खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.
-नरेंद्र गायकवाड, जिल्हा अध्यक्ष, युवक आरपीआय, खोपोली
दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे, मात्र दरम्यान आचारसंहिता लागल्याने निधीचे हस्तांतरण व निविदा प्रक्रिया या बाबींना अडचणी निर्माण झाल्या. आता आम्ही यासंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. दरम्यान, निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या दोन्ही रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल. तोपर्यंत खड्डे भरण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाईल.
-सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली