सचिन तेंडुलकरचे मत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये एका मोठ्या बदलाची गरज बोलून दाखवली आहे. आधुनिक काळात प्रेक्षकांचे हित आणि महसुलाच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये नवनवीन गोष्टी अवलंबल्यामुळेच खेळ आणखी समृद्ध होईल, असे सचिन म्हणाला. काळानुसार वन डे क्रिकेटमध्ये बदलाची गरजही त्याने बोलून दाखवली. वन डेमध्ये एकच डाव 50 षटकांचा आहे. त्याऐवजी दोन डाव प्रत्येकी 25-25 षटकांचे असावेत आणि या डावांमध्ये 15 मिनिटांची विश्रांती असावी, जेणेकरून वन डेमध्ये चार डाव खेळले जातील, असे सचिनने सुचवले आहे.
सचिन एका विशेष मुलाखतीत बोलत होता. मी अगोदरच सुचवले की, या फॉरमॅटमध्ये आता एक नव्हे तर 25-25 षटकांच्या दोन डावांची गरज आहे, अशी आठवणही सचिनने करून दिली.
वन डेत अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या जोडल्या जाऊ शकतात. समजा संघ ‘अ’ आणि संघ ‘ब’ यांच्यात 50 षटकांचा सामना आहे. ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकली आणि 25 षटके फलंदाजी केली. आता ‘ब’ संघाला त्यांचा डाव खेळण्याची संधी मिळेल. यानंतर संघ ‘अ’ 26व्या षटकापासून पुढे त्यांच्या उरलेल्या विकेट्ससह डाव पुढे नेईन. अशा पद्धतीने संघ ‘ब’ला त्यांच्या दुसर्या डावात दिलेले आव्हान पेलण्यासाठी मैदानात यावे लागेल. जर संघ ‘अ’ पहिल्याच डावात सर्वबाद झाला, तर संघ ‘ब’ला आव्हानाचा सामना करण्यासाठी 25 षटकांचे दोन डाव असतील, ज्यात विश्रांतीही मिळेल. अशा विविध संकल्पना आहेत, ज्यावर काम करण्याची गरज आहे, असे मत जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या सचिनने व्यक्त केले आहे.