Breaking News

‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न मिळावे’

पनवेल : क्रांतिकारी सेवा संघ यांच्यातर्फे 4 नोव्हेंबर रोजी वाकडी येथे पनवेलचे सुपुत्र व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.

सोमवारी (दि. 4) क्रांतिवीर फडके यांच्या 175व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतिवीर चौक नवीन पनवेल ते वाकडी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाकडी येथील सोसायटीच्या आवारात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी अचला वाजेकर यांनी क्रांतिकारकांचा इतिहास उपस्थितांना समजावून सांगितला. फडके यांनी देशासाठी बलिदान दिले म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी या वेळी एकमुखाने

करण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर मालिका तयार करण्याचा विचार सुरू असताना त्यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हे भाग्य असल्याचे अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितले. क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे हे कार्य जिवंत ठेवण्यासाठी क्रांतिकारी सेवा संघाची स्थापना केली. फडके हे पनवेल तालुक्यातील क्रांतिकारक असल्याने नवीन पनवेल आदई सर्कल येथे वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा बांधण्याची परवानगी द्या. एक वर्षाच्या आत त्यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करून देतो, असे नामदेवशेठ फडके यांनी सांगितले, तसेच आदई येथील या चौकाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे नाव देण्याची मागणीदेखील करण्यात आली. या वेळी रशिया येथे झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक विजेता प्रद्युम्न म्हात्रे याचा सन्मान करण्यात आला. शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ फडके, अमित फडके, एकनाथ भोपी, सुकापूरचे सरपंच किसन भुजंग, राजेश केणी, भगवान भगत, नारायण पाटील, डी. के. भोपी, नरेंद्र भोपी यांच्यासह हजारो नागरिक या जयंती सोहळ्याला उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply