Breaking News

तरुणीवर सामूहिक बलात्कार

राजस्थान ः तरुणीचे अपहरण करून धावत्या गाडीमध्ये तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात नुकतीच घडली. गुन्हा घडला त्याच दिवशी तक्रार नोंदवण्यात आली. पण अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. पीडित मुलगी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असून ती कोचिंग क्लासला जात असताना तिघांनी तिचे अपहरण केले व तिला गाडीत बसवले. पीडित तरुणीचे डोळे बांधून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी पीडित मुलीला गाडीतून उतरवले. याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपींनी पीडित मुलीला दिली. पीडित तरुणीने आरोपींची नावे ओळखली आहेत. दोन आरोपी जवळच्याच गावातील आहेत. पीडित मुलीने गुन्हा घडला त्याचदिवशी तक्रार नोंदवली. मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून आयपीसीच्या कलम 376 डी अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘एस-400 लवकर द्या’

नवी दिल्ली ः एस-400 मिसाइल सिस्टीम खरेदी व्यवहारात भारताने रशियाला 6 हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. आता भारत लवकरात लवकर ही सिस्टीम हस्तांतरीत करण्याची विनंती करणार आहे. एस-400चे वैशिष्ट्य म्हणजे ही सिस्टीम शत्रूची फायटर विमाने, ड्रोन व मिसाइल्स शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाबरोबर पाच एस-400 सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. एकूण 40 हजार कोटीचा हा व्यवहार आहे. मॉस्कोत होणार्‍या भारत-रशिया लष्करी सहकार्यासंबंधीच्या बैठकीत भारताकडून ही मागणी करण्यात येईल. भारताने रशियाबरोबर अकुला-1 ही अणवस्त्र पाणबुडी 10 वर्षांपासाठी भाड्यावर घेण्याचा करार केला आहे. ही पाणबुडी आयएनएस चक्रची जागा घेईल. 2025 पर्यंत अकुला-1 भारतीय नौदलात दाखल होईल. तो पर्यंत आयएनएस चक्रचा भाडेकरार वाढवण्याची शक्यता आहे. ठरलेल्या करारानुसार ऑक्टोबर 2020-एप्रिल 2023 पर्यंत भारताला पाच एस-400 सिस्टीम मिळतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सेंट पिटसबर्ग येथील एस-400च्या उत्पादन प्रकल्पस्थळास भेट देण्याची शक्यता आहे.

दिल्ली कोर्टात आत्महत्यानाट्य

नवी दिल्ली ः दिल्ली पोलिसांच्या 11 तासांच्या सत्याग्रहाच्या दुसर्‍याच दिवशी बुधवारी दिल्लीतील वकील रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या पाच जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी काम बंद केलं आहे. सामान्य माणसांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. वकील कोणालाही कोर्टाच्या परिसरात येण्यास मज्जाव करत आहेत. रोहिणी कोर्टात तर एका वकिलाने इमारतीच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या पतियाळा हाऊस कोर्ट, साकेत कोर्ट, रोहिणी कोर्ट, कडकड्डूमा कोर्ट आणि तीस हजारी कोर्टात वकील आंदोलन करीत आहेत. रोहिणी कोर्ट परिसरात एक वकील इमारतीवर चढला. आरोपी पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत या वकिलाने आत्महत्येचा इशारा दिला. खूप वेळ हे नाट्य सुरू होते. कोर्ट परिसरात यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर त्याला इमारतीवरून सुखरुप उतरविण्यात आलं. रोहिणी कोर्टाबाहेरही एका वकिलाने स्वत:वर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply