गव्हाण : रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील एसएससी परीक्षा मार्च 2020मध्ये प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र नोंदणीचा शुभारंभ विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते झालेल्या या समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र नोंदणी करून घेण्यात आले.
आवेदनपत्र नोंदणी शुभारंभ वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असणार्या वटवृक्षाचे रोपण अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. शुभेच्छापर भाषणात अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उमेदीच्या काळात कठीण परिश्रम घेतले, तर उर्वरित आयुष्य आनंदी जगता येते त्यासाठी आज परिश्रमाला पर्याय नाही, असे
प्रतिपादन केले.
या वेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, प्राचार्या साधनाताई डोईफोडे, उपप्राचार्य राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, प्रा. राजू खेडकर, वर्गशिक्षक चित्रा पाटील, सागर रंधवे, संदीप भोईर, लेखनिक चंद्रकांत मढवी, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले.