पनवेल : रामप्रहर वृत्त
दि. बा. पाटील यांच्या आंदोलनात हिरिरीने भाग घेणार्या, त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राघुबाई म्हात्रे यांचे बुधवारी (दि. 18) वयाच्या 103व्या वर्षी निधन झाले. वयाची शंभरी उलटली असली, तरी विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असता 10 जून रोजी झालेल्या साखळी आंदोलनात, 24 जुलैच्या सिडको घेराव आंदोलनात त्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र किती कडवा असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राघूबाई म्हात्रे. देशभर गाजलेल्या जासई येथील आंदोलनात 16 जानेवारी 1984 रोजी दोन हुतात्मे झाले होते त्या दिवशी राघूबाई म्हात्रे यासुद्धा गोळीबारात जखमी झाल्या होत्या. तरीही त्या हिंमत हरल्या नाहीत. त्यानंतर झालेल्या शेतकर्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. 10 दिवसांपूर्वी झालेल्या मशाल मोर्चातही त्यांनी खणखणीत आवाजात नवी मुंबई विमानतळासाठी दिबांच्या नावाची आग्रही मागणी केली.
मशाल मोर्चाच्या दिवशी एका मुलाखतीत त्यांनी 1984 पासून झालेल्या आंदोलनाच्या स्मृती जाग्या केल्या होत्या. नामांतर आंदोलनात प्रमुख भूमिका निभावणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनाही राघूबाई आवर्जून भेटल्या. त्यावेळी रामशेठ ठाकूर यांनी राघूबाईंना आग्रहाने आपल्या बरोबर जेवायला बसवले. भावूक झालेल्या राघूबाई त्या वेळी म्हणाल्या की, रामशेठ जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळत नाही तोवर अखेरच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार. झुंजार, लढवय्या राघूबाईंच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …