Breaking News

सर्पमित्र

जीवे जीवश्च जीवनम्

सरपटत, दगड चुकवत त्या मुक्या प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी चालणारी धडपड पहिली की कंठ दाटून येतो. मुक्या प्राण्यांनाही जीव आहे. ते  निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवणार्‍यांचा स्पर्श कळतो. वाचवणार्‍यांना कधी दंश केला आहे असा एखादा अनुभव नाही, एखादे उदाहरण नाही. मारणार्‍याला दंश केला आहे असेही नाही. जीव वाचवण्याच्या भीतीने मुके प्राणी मानवी वसाहतीपासून दूर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. सापांचे जीव वाचवण्यासाठी सध्या तरुण पिढी पुढे येत असून या तरुण पिढीने अनेक सापांना जीवदान दिले आहे. पूर्वी दिसला साप की मार दगड, मार काठी हा प्रकार सध्या काही अंशी कमी झाला आहे.

साप हा शत्रू नसून मित्र आहे ही भावना सध्या रुजत आहे. कुठलेही प्रशिक्षण नसताना एका ध्येयाने तरुण पिढी समोर येत असून मुक्या प्राण्यांना वाचवणार्‍यांना सर्पमित्र हा शब्द प्रचलित झाला आहे. साप असल्याची खबर मिळताच ध्येयाने पछाडलेल्या सर्पमित्रांच्या अंगात सामाजिक जाणीव निर्माण होत  निसर्गातील एका जीवास जीवदान देण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी ना मोबदला, कुठेही येण्या-जाण्यासाठी ना वाहन, ना धोका पत्करण्यास कुठल्या संरक्षणाची हमी.  निसर्गातील मुक्या प्राण्यांस जीवदान देणे आणि हे पवित्र काम सर्पमित्र म्हणून नव्याने उदयास आलेली एक सामाजिक बांधिलकी व ध्येयाने प्रेरित पिढी करीत आहे. साप शब्द उच्चारताच  अंगावर काटा येतो, भीती वाटते. साप चावून माणूस मरतो, असा अनेकांचा समज आहे, पण तसे पाहिले तर भारतातील सर्वच साप विषारी नाहीत. माणसांशी संबंध येणारे मण्यार, नाग आणि फुरसे घोणस हे  साप विषारी आहेत.

निसर्गातील महत्त्वाचा प्राणी हळूहळू कमी होत गेला म्हणजे नक्कीच अन्नसाखळीचा बिघाड होतो म्हणूनच साप वाचावा या उद्देशाने अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत. भारतात उत्पादित होणार्‍या अन्नधान्यापैकी सुमारे 27 टक्के धान्य उंदीर खातात किंवा नासाडी करतात आणि बर्‍याच सापांचे प्रमुख खाद्य उंदीर आहे. साप उंदीर व घुशींची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. धामण एका वर्षात सुमारे 300 उंदीर खाते. उंदरांच्या एका

जोडीपासून दरवर्षी साधारण 900 पिल्ले होतात. यावरून उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी सापाचे महत्त्व आपल्याला दिसून येते. केवळ नियंत्रित ठेवण्यासाठी सापांचा उपयोग होतो असे नाही, तर मेडिकल विभागातही सापांच्या विषाचा उपयोग होतो.  तसेच प्रतिविष तयार करण्यासाठी सापांच्या विषाचा वापर केला जातो.

जगात दोन हजार 700, तर भारतामध्ये साधारणतः 300 प्रकारच्या सापाच्या जाती आढळतात. त्यामध्ये फक्त पाच ते सहा साप विषारी असून इतर निमविषारी, बिनविषारी आहेत. बिनविषारी सापांमध्ये अजगर, धामण, तस्कर, हरणटोळ, गवत्या, वाळा, पाणसाप, दिवड, मांडूळ, नानेटी, कवड्या, तर विषारी सापांमध्ये नाग, मण्यार फुरसे, घोणस, पोवळा, पट्टेरी पोवळा, चापाडा अशा जाती आहेत. विषारी साप चावल्यास पेशंटला प्रथम धीर द्यावा. नजीकच्या हॉस्पिटलमध्ये  घेऊन जावे. चावलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारे मलमपट्टी करू नये, अथवा ब्लेडने कापू नये. कुठल्याही मांत्रिकाकडे घेऊन जाऊ नये. आवळ पट्टी बांधणे हानिकारक असल्याचे सांगितले जाते. साप चावल्यानंतर र्रीीं (रपींळ ीपरज्ञश र्ींशीेा) म्हणजे प्रति सर्पविष एकमेव उपाय असून कोणत्याही प्रकारचा गावठी इलाज करू नये, असेही सांगितले जाते. याचेही दोन प्रकार आहेत. हरशोीेुंळल र्ींशपेा ह्युमोटॉनिक्स विष रक्ताभिसरण प्रक्रियेवर आघात करते. पर्शीीेुळल र्ींशपेा न्युरो टॉक्सीक विष मज्जासंस्थेवर आघात करते. साप आपल्या घरी येऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. स्वच्छता नसल्याने उंदीर-घुशींना पोषक वातावरण मिळते आणि ते खाण्यासाठी साप आपल्या घरात किंवा घराच्या आवारात प्रवेश करू शकतात. त्यामुळे स्वच्छता असणे आवश्यक आहे. शक्यतो जमिनीवर झोपणे टाळावे. घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत कापून टाकावे. रात्री टॉर्च सोबत घेऊन बाहेर पडावे. पायात शूज असणे आवश्यक आहे, तसेच कोणत्याही कारणासाठी जिवंत सापाचे प्रदर्शन करणे ही बाब काटेकोरपणे टाळली पाहिजे. कोणताही सर्पमित्र असे करताना आढळल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याला उचित कारवाईला सामोरे जावे लागते. सापांना गरज नसताना हाताळल्यामुळे सापावर अनावश्यक ताण येऊन क्वचितप्रसंगी निव्वळ ताणामुळे सापाचा मृत्यू होऊ शकतो.

सापाच्या मानेचा भाग नाजूक असल्याने त्या भागास धरण्याचे टाळावे. जखम होण्याची शक्यता असते. मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत सर्पमित्रांनी सर्प सोडण्यासाठी अजिबात जाऊ नये. विषारी साप सोडण्याबाबत वनखाते व स्थानिक सर्पमित्र यांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून काही ठरावीक जागा निश्चित कराव्यात. या जगा नियमितपणे साधारणतः 30 दिवसांच्या अंतरात बदलल्या जाव्यात. साप 11 किमी अंतरावर सोडण्यात यावा, जेणेकरून वातावरणाच्या बदलाशी समरूप होणे शक्य होते. बिनविषारी साप असेल तर मानवी अधिवासापासून थोडेसे दूर परंतु प्रत्यक्ष साप पकडलेल्या जागेच्या शक्य तितक्या जवळ सोडण्याचा प्रयत्न केला जातो. सर्प बचाव व पुनर्वसन यांच्या नोंदी वहीत नमूद करतात. बचाव करण्याआधी किंवा नंतर प्रत्यक्ष जागेवर  छायाचित्रण करून अधिवास ओळखण्यास मदत होईल असे केले जाते. जर साप निसर्गात सोडण्यासाठी योग्य असेल तर शक्य तितक्या लवकर 24 तासांत सर्प  पुनर्वसन धोरणानुसार मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात येतो.

साप वाचवण्याच्या कार्याच्या वेळी आवश्यक अशा साहित्यांचा ट्यूब, पाईप्स, हुक्स, टोंग वापर करणे सुरक्षेसाठी गरजेचे असते. जखमी साप किंवा नुकतेच खाद्य भक्षण केले आहे  अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशा वेळी सापाला कमीत कमी हाताळणी तसेच गहू किंवा गडद रंगाच्या कापडी पिशव्या व पाइप वापरून साप पकडणे गरजेचे आहे. जमलेल्या गर्दीला पकडलेल्या सापाविषयी माहिती देऊन त्याचा अधिवास आणि वावर आदी गोष्टी सांगून प्रबोधन केले जाते. सर्प संरक्षण स्वयंसेवक होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीने स्थानिक उपवनसंरक्षक विभागीय वन अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात परिशिष्ट दोन अर्ज करावा लागतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी आपले समाधान झाल्यावर त्याचे नाव सर्प संरक्षण स्वयंसेवक यांच्या यादीत समाविष्ट करून जनतेच्या माहितीसाठी जारी करतात. सर्प संरक्षण स्वयंसेवक येणार्‍या व्यक्ती सर्पविषयक शास्त्रीय ज्ञान असलेला, अनुभव असलेला असावा.नोंदणीकृत सर्पमित्रांना वनविभागातर्फे त्यांच्यासोबत सेवांसाठी कोणती परिश्रमिक व मोबदला दिला जात नाही. कारण हे बचावकार्य स्वेच्छेने केले जाते, तथापि सापांचा बचाव करताना केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची परतफेड केली जाऊ शकते.

सर्प बचाव खरोखरच आवश्यक आहे का याचेही मूल्यांकन होणे गरजेचे असते. काही वेळा साप स्वतःहून सुरक्षित ठिकाणी निघून जात असतो. वन खात्याच्या स्थानिक कार्यालयाद्वारे सर्प बचावणारे यांचे नियमन करणे व स्थानिक पातळीवर जबाबदार सर्पमित्र घडवणे तसेच वनखात्याकडे सर्पमित्रांनी जमा करावे. जनतेसाठी अधिकृत नमुना तयार करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. सर्पमित्रांना झालेल्या जीवघेण्या सर्पदंश यासारख्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर सुधार मार्गदर्शक तत्त्वे क्षेत्रीय अधिकारी सदर क्षेत्रातील अनुभवी स्वयंसेवक व स्वयंसेवी संघटना यांचे सखोल विचारविमर्श करून तयार करण्यात आली आहे. ही तत्त्वे किंवा आचारसंहिता यांची व्यक्ती अतिशय मर्यादित असून ती केवळ सर्प उपचार व पुनर्वसन करू शकतात.

सर्पमित्र ही संकल्पना महाराष्ट्रात चांगली रुजली आहे. राज्यात बहुतांशी गावांमध्ये सर्पमित्र कार्यरत आहेत. साधारणपणे तरुण पिढीचा सर्पमित्र बनण्याकडे कल असतो, तर सोशल मीडिया व प्रसिद्धीच्या नादाने सापांची खोड काढणे, स्टंटबाजी करणे याकडे अनेकांचा कल झुकत आहे. या नादात थेट जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्पमित्र होण्याकडे तरुण-तरुणींचा मोठा कल असला तरी स्थानिक पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी असून सर्पमित्र आणि वनविभागादरम्यान बर्‍याच काळापासून समन्वयाचा एक गंभीर अभाव समोर येत आहे. म्हणून मार्गदर्शक सूचना बनवणे वन विभागाची गरज बनून राहिली आहे. तरुण आणि कोवळ्या वयामध्ये सापांसंदर्भात आवश्यक भीती जर कमी झाली तर सापांसंदर्भातील गैरसमज आपोआप कमी होतील. त्यामुळे अनावश्यकरीत्या सापांच्या हत्या कमी होतील. महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून नावारूपास येत आहे. सर्पमित्रांसाठी आचारसंहिता तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनामध्ये वन विभागाने मागील काही वर्षांत केलेली प्रगती पाहता मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी होण्यास हातभार लागला आहे. जीवे जीवश्च जीवनम् असे संस्कृतमधील वचन अतिशय अर्थपूर्ण आहे.

जैवसृष्टीतील एक जीव दुसर्‍यावर अवलंबून असतो. त्यामुळे निसर्गचक्र आबाधित राहण्यास मदत होते. सर्पमित्रांची संख्या वाढतच आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण ही नोंदणीकृत सर्पमित्र संस्था जिल्ह्यात नावारूपास आली असून लोकांच्या मनात सापांविषयी असलेली भीती, गैरसमज दूर करून शास्त्रीय माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. जयवंत ठाकूर, राजेश पाटील, म्हात्रे, मोकळ, घरत, केणी अशी किमान 35 सर्पमित्रांची टोळी सर्प वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्यरत असते. खोपोली-खालापुरात अमोल ठकेकर, प्रदीप कुलकर्णी, अभिजित घरत, योगेश शिंदे, अरविंद गुरव, सागर मोरे, अक्षय गायकवाड, राजेश अभानी, नवीन मोरे, पंकज मोरे, अरविंद गुरव, रोषन पालांडे, सुशील गुप्ता, प्रीतम गावडे, चेतन चौधरी, अशोक मिस्त्री, रोहिदास म्हसणे, प्रसाद लोट, कृष्णा किलंजे, दानिश ओसवाले, धर्मेंद्र रावळ, संजय केळकर असे सर्पमित्र अहोरात्र सामाजिक जाणिवेतून मुक्या प्राण्यांना जीवदान देत आहेत.

त्यांनी ऑक्टोबर 2019 महिन्यात तब्बल 89 सापांना जीवदान दिले आहे. जानेवारी 18, फेब्रुवारी 13, मार्च-एप्रिल 18, मे 13, जून 27, जुलै 68, ऑगस्ट 50, सप्टेंबर 72 असे सापांना जीवदान दिले आहे. यामध्ये हरणटोळ, मण्यार, ब्लॅक हेडेड,  घोणस, नाग, मांजर्‍या, कुकरी, दिवड, कवड्या, अजगर, चापडा, धूळ नागीण, तस्कर, धामण, नानेटी अशा ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सापांचा समावेश आहे. गरज आहे ती त्यांना वन विभागाने अधिकृत परवाने किंवा ओळखपत्र देण्याची.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply