सलग दुसर्यांदा बहुमान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले आहे. त्यामुळे भारतात सलग दुसर्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात 13 ते 29 जानेवारी रोजी होईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने (एफआयएच) कळविले आहे. त्याचबरोबर एफआयएचच्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत स्पेन आणि नेदरलँड्सला 2022च्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होते. भारतातील स्पर्धेचे ठिकाण अद्याप ठरले नसले तरी ओडिशातील भुवनेश्वर हे हॉकीचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे भुवनेश्वरमधील कलिंगा येथेच विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी चर्चा आहे.
विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने 1982 (मुंबई), 2010 (नवी दिल्ली) आणि 2018 (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे. भारतासह बेल्जियम व मलेशिया यजमानपदाच्या शर्यतीत होते, पण भारताची निविदा सर्वोत्तम ठरली.