Breaking News

अधिवेशनातून पळ काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : दरेकर

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या फैलावाचे कारण देऊन हिवाळी अधिवेशन दोन दिवसात आटोपल्यानंतर आता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील या भीतीनेच अधिवेशनातून पळ काढण्याचा या सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढीव वीज बिले, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, असे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात जे प्रश्न आज उभे राहिले आहेत त्या संदर्भात समाजातील प्रत्येक घटकामध्ये असंतोष निर्माण झाला असून, तो आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. हे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील ही भीती राज्य सरकारला आहे. वर्षभर कोरोनाच्या नावाखाली या सरकारने काहीच केले नाही, आता त्याच कारणास्तव अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन अधिवेशन झाले पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असाच आमचा सरकारकडे आग्रह राहील.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply