मानवप्राणी हा सामाजिक प्राणी असून समवयस्क मित्रमंडळींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, देवाणघेवाण या त्याच्या नैसर्गिक गरजा आहेत. समाजमाध्यमांतून हा संपर्क, संवाद साधला जातो असा आभास निर्माण होत असला तरी समाजमाध्यमे ही तितकीच तुम्हाला एकाकी करणारीही असू शकतात असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघतो आहे.
समाजमाध्यमांच्या प्रभावाची चुणूक एव्हाना सर्वच क्षेत्रांमध्ये कळून चुकली आहे. स्वाभाविकच जगभरातच त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. फेसबुक, व्हॉट्रसअॅप, इन्स्टाग्रॅम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून इंटरनेटचे सर्वाधिक वापरकर्ते हे समाजमाध्यमांचेच वापरकर्ते आहेत. 2018 मध्ये जगभरात सुमारे 2.65 अब्ज लोक समाजमाध्यमांचा वापर करीत होते. ही संख्या 2021 पर्यंत 3.1 अब्ज इतकी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. जगाच्या कानाकोपर्यात समाजमाध्यमांचा फैलाव होत असून जानेवारी 2019 मध्ये हे प्रमाण 45 टक्के असल्याचे सांगितले जाते. भारतातही इंटरनेटचा वापर सहजशक्य असल्याने समाजमाध्यमांचा वापर करणार्यांची संख्या 2018 मध्येच 32 कोटी 61 लाख इतकी नोंदली गेली होती. 2023 पर्यंत ही संख्या वाढून 44 कोटी 80 लाख होईल असा अंदाज आहे. समाजमाध्यमांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला अभिव्यक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले आहे. सामान्यांची विविध विषयांसंबंधीची जागरुकता वाढवण्यातही समाजमाध्यमांचे योगदान मोठे आहे. तरुण वर्गाला शाळा-कॉलेजच्या भिंतींबाहेर अनेक गोष्टी आणि कला शिकण्यातही समाजमाध्यमांची मोठी मदत होत असते. तरुण वर्गाचा अर्थात उद्याच्या प्रौढांचा तर जगण्याचा मोठा भाग समाजमाध्यमे व्यापत आहेत. तरुणच काय, अगदी किशोरवयीन मुले देखील आजच्या घडीला व्हॉट्सअॅप ग्रुप आदींमार्फत आपल्या मित्रमंडळींच्या संपर्कात असल्याचे आढळून येते. संपर्क आणि संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून सगळ्यांनाच समाजमाध्यमांची मोठी मदत होत असून त्यासंदर्भातील त्यांचे सकारात्मक योगदान कुणीही नाकारत नाही. परंतु त्याचवेळेला मानसिक आरोग्यावर समाजमाध्यमांमुळे होणार्या दुष्परिणामांबद्दलही तज्ज्ञ सातत्याने सावधान करीत आहेत. समाजमाध्यमांच्या वापराचा वेळ जसजसा वाढतो त्याच्या व्यस्त प्रमाणात तरुणांची स्वत:च्या भावनिक व्यवस्थापनाची क्षमता कमी-कमी होत जाताना दिसते आहे. आजच्या काळात विशेषत: 18 ते 29 वयोगटातील तरुण-तरुणींना प्रचंड बदलांना व ताणाला सामोरे जावे लागत असून यापूर्वीच्या पिढ्यांपेक्षा त्यांच्यावरील ताण खूपच अधिक असल्याचेही आजवरच्या काही महत्त्वपूर्ण अभ्यास व पाहणींमधून दिसून आले आहे. नेमक्या याच वयोगटात समाजमाध्यमांचा वापर वाढताना दिसतो व त्यामुळे त्यांच्यावरील ताणात भरच पडते. यातून एक प्रकारचे दुष्टचक्र निर्माण होते. पराकोटीच्या ताणामुळे तरुण मंडळी समाजमाध्यमांच्या वापराकडे वळतात आणि त्यातून त्यांच्या ताणात भरच पडते आणि मग त्याचेही उत्तर ती पुन्हा समाजमाध्यमांवरच शोधतात. समाजमाध्यमांच्या अतिरिक्त वापरामुळे नकारात्मक भावनांचा निचरा होत नाही व एक तर्हेने या नकारात्मक भावनांचा मनावरील ताण वाढत राहतो. तरुणांसंदर्भातील शैक्षणिक व अन्य धोरणांमध्ये या संशोधनांचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.