पनवेल : रामप्रहर वृत्त
साहित्यसंपदा ही रायगडमधील साहित्य क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था असून, या संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे नुकतीच संमेलनाचे प्रवक्ते वैभव चौगुले यांनी जाहीर केली.
पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे- साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांना गौरविले जाणार आहे, तर महाराष्ट्र समाजरत्न म्हणून अभयकुमार साळुंखे, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मगनलाल रजपूत, जितेंद्र बजाज यांना गौरविले जाणार आहे. त्यासोबतच साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही जाहीर झाले आहेत. त्यात सामाजिक विषयांवरील लिखाणाबद्दल डॉ. कुमार ननावरे (मी सरकारी डॉक्टर), कथासंग्रह आप्पासाहेब जकाते (खुरपं दोरी), विशेष पुरस्कार सुजय देसाई (शंभुजागर), काव्यसंग्रह ऋचा वाघमारे, बालसाहित्य हेमंत नेते, कादंबरी संदीप बोडके (उजळली सांजवेळ), पत्रकार क्षेत्रातील विशेष योगदान दत्ता पाटील, दुष्काळी भागात पाण्यासाठी विशेष योगदान डॉ. शिवकुमार पवार, सर्पमित्र मंगेश अंमलदार, संभाजी चौगले, निसर्गमित्र अवधूत पाटील यांचाही विशेष गौरव केला जाणार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती अध्यक्ष सारंग चव्हाण आणि स्वागताध्यक्ष स्मित शिवदास, तसेच समूहातील इतर सदस्य अविरत मेहनत घेत आहेत, असे समूह संस्थापक वैभव धनावडे यांनी माहिती देताना सांगितले.