अरुणशेठ भगत यांनी केले सुपूर्द
पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी हे साहित्य गुरुवारी (दि. 13) आरोग्य केंद्राला सुपूर्द केले.
कोरोना वैश्विक महामारीचा प्रसार वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली तसेच वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली होती. या वेळी आरोग्य अधिकार्यांनी प्राथमिक केंद्राला आवश्यक असलेल्या आरोग्य साहित्याची मागणी केली होती. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी ताबडतोब हे साहित्य देण्याचे मान्य केले. त्यानुसार मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आरोग्य केंद्राला साहित्य सुपूर्द केले.
यामध्ये 100 फेस शिल्ड, 500 डिस्पोजेबल मास्क, 40 थर्मामिटर, 500 मास्क, ग्लोव्हज, अर्धा लिटर सॅनिटरयझरच्या 50 बाटल्या, 40 ऑक्सिमिटर अशा एकूण एक लाख 30 हजार रुपयांच्या वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय भगत, अमृत भगत, विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, डॉ. अस्मिता बोभटकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आशा सेविकांना अर्थसहाय्य
आरोग्य केंद्रातील आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळते. त्यामुळे कोरोना काळात काम करताना आशा सेविकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य केंद्राच्या भेटीत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनीही बाब लक्षात घेत येथे काम करणार्या 12 आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दोन महिने देण्याचे मान्य केले आहे, तसेच कोरोनाची परिस्थिती वाढल्यास पुढील काळातही मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.