Breaking News

सुकापूर रस्त्यालगत अतिक्रमण, ग्रामपंचायतीकडून कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार

सुकापूर गावालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पाली देवद ग्रामपंचायतीने केली आहे.

नवीन पनवेल शहराला लागूनच असलेले सुकापूर या गावाजवळील जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेली आहेत. नवीन व जुने सोफा, लादी, मार्बल, मटण, पाणीपुरी आदी प्रकारची दुकाने येथे सुरू करण्यात आलेली आहेत. यातील बहुतांशी परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडून काही नागरिक भाडे वसूल करत असल्याचे समोर आले आहे. पावसाळा संपल्यापासून या ठिकाणच्या अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यालगत अनेक हातगाड्या, लाद्यांच्या दुकानापासून बेड, सोफा, बेकायदेशीर घरे, पक्की बांधकामे, गाड्या धुण्याचे सेंटर, स्टॉल उभारले गेले आहेत. सुकापूर माथेरान रस्त्याकडे मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी शिरकाव केला आहे. दिवसागणिक रहिवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बिनदिक्कतपणे अतिक्रमण केले जात आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे. त्याचा परिणाम जमिनीच्या भावावर झाला असून, जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. रस्त्यालगतच्या जागा अनेक धनदांडग्यांनी बळकावल्या आहेत. यात सार्वजनिक बांधकाम खात्याची जागादेखील सोडण्यात आलेली नाही. या जागेचा खाजगी वापर केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे माथेरान रस्त्यावरील जागा 1965 ते 1970च्या दरम्यान हस्तांतर केली असल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली दिसत आहेत. यावर कारवाई करण्यात येत नाही. आजतागायत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कारवाई करण्यात आलेली नसल्याने अतिक्रमणांची संख्या वाढत चालली आहे. पाली देवद ग्रामपंचायतीने या अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, जिल्हाधिकारी, पंचायत समिती यांना कळविले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply