काश्मीरप्रश्नी अमित शहांचा विरोधकांना प्रतिसवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित करणार्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 20) आपल्या खास शैलीत उत्तर दिले. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे, मात्र काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत कारवाया अजूनही सुरू आहेत असे सांगतानाच इंटरनेट जास्त महत्त्वाचे आहे की सुरक्षा, असा प्रतिप्रश्न शहा यांनी विरोधकांना केला. कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट बंद आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. हे सगळे कधी सुरळीत होणार असा प्रश्न राज्यसभा सदस्य गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला होता, तर परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी खासदार माजिद मेमन यांनी केली. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर उत्तर दिले. ‘कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. दगडफेकीच्या घटना खूपच कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांवर एकही गोळी चालवण्यात आलेली नाही’, असे शहा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तेथील 20,412 शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षादेखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होत आहेत. त्याचप्रमाणे औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इंटरनेट बंदीवरही शहा यांनी सरकारची भूमिका मांडली. ’इंटरनेट हे संवादाचे व माहितीचे महत्त्वाचे माध्यम आहे, हे मान्य आहे, मात्र काही वेळा प्राधान्यक्रम बघावे लागतात. स्थानिक प्रशासन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेईल. इंटरनेट पूर्ववत करताना शेजारील देशाच्या कारवायादेखील लक्षात घ्याव्या लागतात, असे शहा यांनी सांगत विरोधकांची बोलतीच बंद केली.