Breaking News

अयोध्या निकालानंतर कर्जतमध्ये आनंदोत्सव

कपालेश्वर मंदिरात गीतरामायण

कर्जत ः बातमीदार

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागा राममंदिरासाठी देण्याचा निकाल दिला आहे. कोर्टाच्या या अयोध्या निकालानंतर श्रीरामचंद्रांना वंदन म्हणून कर्जतमधील कपालेश्वर मंदिरात आरती आणि गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास गर्दी केली होती. कर्जतमध्ये रामजन्मभूमी प्रश्नावर हिंदू जनतेच्या बाजूने निर्णय लागल्यानंतर कर्जत शहरात सर्वांना गीतरामायण ऐकायला मिळाले. कर्जतमधील गायक प्रसाद कारूळकर यांच्या आवाजातील अजरामर गीतांना हार्मोनियमवर महेंद्र नाईक यांनी, तर तबल्यावर उदय केळकर यांनी साथ दिली. या वेळी कर्जत शहरातील हिंदुत्ववादी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भारतीय मजदूर संघटनेचे संघटनमंत्री अ‍ॅड. अनिल ढुमणे यांनी अयोध्या निकालाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल 1045 पानांतील निकालपत्राबाबत मार्मिक विश्लेषण केले. वकिलांकडून स्पष्टीकरण केले जात असताना नागरिक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद देत होते.  या कार्यक्रमाला कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांसह भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, कर्जत नगरपालिका नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे यांसह ज्येष्ठ समाजसेविका ठमाताई पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चितळे, विश्व हिंदू परिषदेचे विशाल जोशी, बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे, दिनेश सोलंकी, सूर्यकांत गुप्ता, माजी नगरसेविका बिनीता घुमरे तसेच स्नेहा गोगटे, राहुल कुलकर्णी, सरस्वती चौधरी, शर्वरी कांबळे, अ‍ॅड. ऋषिकेश जोशी तसेच असंख्य कर्जतकर उपस्थित होते.

वेणगावमध्ये महाआरती

रामजन्मभूमी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे महाआरती करण्यात आली. तेथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हभप पांडुरंग घाग यांनी प्रथम दीपोत्सव केला. नंतर त्रिवार ओमकार जप आणि श्रीराम जय जय राम असा जप करण्यात आला. त्यानंतर महाआरती घेण्यात आली. या वेळी भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply