कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पक्षात दाखल
कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रीय काँग्रेस आणि चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खांडपेमधील भाजप प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचाही समावेश आहे.
पेण येथे झालेल्या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रवि पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष तथा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत चिंचवली गावातील गणेश भगत, नरेश तुपे, दिनेश कांबरी, सुरेश सुभाष भगत, संदीप नारायण भगत, अमोल कांबरी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्याच वेळी खांडपे ग्रामपंचायतीमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बंधू पाटील यांचे सुपुत्र पंकज पाटील हे 50 कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले. बंधू पाटील सध्या काँग्रेस पक्षात असून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कर्जत तालुक्यात चर्चा होती. या प्रवेश सोहळ्याला भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने यांच्यासह कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.