
सुधागड-पाली ः प्रतिनिधी
सुधागडातील जिल्हा परिषदेच्या एकूण 154 शाळांपैकी 2016 ते 2018पर्यंत 18 शाळांना टाळे लागले असून, ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालकवर्ग स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बंद असलेल्यांत तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, विडसई, मुळशी, वेळकरपाडा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेणवली या शाळांचा समावेश आहे. यातील 9 ते 10 शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तालुक्यातील खासगी व इंग्रजी मीडियमच्या शाळा असल्याने पालकांची मानसिकता माझ्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने खासगी शाळेत पाठवले जात आहे. त्याचबरोबर शिक्षकांची मुले-मुली खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने खेड्यातील पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच आदिवासींचे स्थलांतर होणे थांबले नाही व खेडोपाड्यांतील नागरिकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे खेड्यांतून शहरांकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शाळेत शासनाच्या नियमानुसार पटसंख्या कमी असल्याने या 18 शाळांना टाळे लागले आहे. डोंगराळ भागात असणार्या शाळा बंद झाल्याने मुलांना शिक्षणाविना राहावे लागत आहे. खेडोपाड्यांत शिक्षणाची व्यवस्था बिकट झाली आहे. शिक्षण व्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन खर्च करत आहे, परंतु खासगीकरणामुळे आदिवासी गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना शाळा बंद झाल्याने सुविधा नसल्याने नाइलाज म्हणून खासगी शाळेत पाठवावे लागत आहे. परिणामी तेथील शाळेत भरमसाठ आकारलेली फीही भरावी लागत आहे.
शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 असली पाहिजे. त्यापेक्षा कमी असल्यास शाळा बंद करावी लागते. यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद झाल्या आहेत.
-शिल्पा पवार, गटशिक्षण अधिकारी, सुधागड-पाली
सुशिक्षितांना रोजगार मिळाल्यास व आदिवासींचे स्थलांतर थांबल्यास खेड्यापाड्यांतील शाळांची पटसंख्या वाढू शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिल्यास खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणार्यांची संख्या कमी होऊ शकते.
-आरती भातखंडे
सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिकावे याकरिता शासनाने अनेक सोयीसुविधा दिल्या असून या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात जि.प. शाळा अयशस्वी ठरल्याने खासगी शाळांचे फावले आहे. यात बदल घडल्यास जि. प. शाळांची पटसंख्या वाढू शकते.
-प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था