कृषी अधिकारी अनाप यांच्या सूचना
म्हसळा : प्रतिनिधी
प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणार्या नुकसानीत शेतकर्यांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे. म्हसळा तालुक्यातील प्रत्येक बागायतदाराने आंबा व काजू पिकाचा विमा उतरविणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे म्हसळा तालुक्याचे (प्र) कृषी अधिकारी ज्ञानदेव अनाप यांनी आढावा बैठकीत सांगितले. म्हसळा तालुक्यात आंबा पिकाखाली 1879 हेक्टर व काजू पिकाखाली 769 हेक्टर क्षेत्र असल्याचे अनाप यांनी सांगितले. या योजनेत तापमान, पाऊस, आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे या हवामानाच्या धोक्यांमुळे होणार्या नुकसानीपासून आंबा व काजू या फळपिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. सदर योजना पिकाखालील क्षेत्राशी निगडित असून योजनेंतर्गत पीक विमा उतरविण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. काजू पिकासाठी हेक्टरी 4250 रु. व आंबा पिकासाठी हेक्टरी 6050 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. शिवाय गारपिटीसाठीसुद्धा जादा विमा हप्ता भरून शेतकरी विमा संरक्षित होऊ शकतात. योजनेत कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणार्या शेतकर्यांसह सर्व शेतकर्यांना सहभागी होता येणार आहे. ज्या शेतकर्यांनी विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले अशा सर्व शेतकर्यांना ही योजना सक्तीची असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक असणार आहे.
यंदाचे हवामान बदल विचारात घेता तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी तसेच आंबा व काजू बागायतदारांनी विमा हप्ता रक्कम भरून विमा संरक्षित व्हावे.
-ज्ञानदेव अनाप, तालुका कृषी अधिकारी, म्हसळा