Breaking News

बंदी घातलेल्या दीपिका, स्नेहल भारतीय संघात

मुंबई : प्रतिनिधी

काठमांडू (नेपाळ) येथे होणार्‍या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या दोन्ही कबड्डी संघांची निवड करताना निवड समितीने अजब प्रयोग केला. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत गारद झालेल्या आणि नुकतीच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या दीपिका जोसेफ आणि स्नेहल शिंदे यांना भारताच्या मुलींच्या संघात स्थान देण्यात आले आहे, तर दुसरीकडे उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार्‍या महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघातील एकाही खेळाडूला भारतीय संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाने राष्ट्रीय कबड्डी शिबिराच्या समाप्तीनंतर 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा केली. पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या अपयशाला कारणीभूत ठरलेल्या दीपिका जोसेफ आणि स्नेहल शिंदे यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेने अनुक्रमे पाच आणि दोन वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय घेतला गेला, तेव्हा राष्ट्रीय शिबिरासाठी दीपिका, स्नेहल आणि सायली केरिपाळे या बंदी असलेल्या तीन मुलींची निवड झाल्यामुळे राज्य संघटनेने बंदीसंदर्भातील पत्र भारतीय कबड्डी महासंघाला पाठवले होते. त्यामुळेच दीपिका आणि स्नेहलच्या निवडीबाबत कबड्डी क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रोहतक येथे झालेलया राष्ट्रीय शिबिरासाठी रिशांक देवाडिगा, तुषार पाटील, विकास काळे, विशाल माने आणि गिरीश ईर्नाक या पाच जणांची निवड झाली होती. कारण रोहा येथे झालेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय

स्पर्धेत महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती, पण भारतीय रेल्वेकडून पराभवामुळे महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. या संघातील एकाही खेळाडूला भारताच्या संघात स्थान मिळवता आलेले नसल्यामुळे राज्यातील कबड्डी क्षेत्रात नाराजी प्रकट केली जात आहे.

भारताचा महिला संघ : कर्णधार प्रियांका, साक्षी कुमारी (हरियाणा), उपकर्णधार दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे (महाराष्ट्र), रितू कुमारी (बिहार), निशा (दिल्ली), पुष्पा (हिमाचल प्रदेश), पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे (भारतीय रेल्वे), ममता कुमारी (राजस्थान), हरविंदर कौर (पंजाब).

भारताचा पुरुष संघ : कर्णधार दीपक (राजस्थान), उपकर्णधार पवन कुमार, सुनील कुमार, परवेश भन्सवाल, विकास (भारतीय रेल्वे), नितेश कुमार, नवीन कुमार (सेना दल), विशाल भारद्वाज (हिमाचल प्रदेश), प्रदीप नरवाल, अमित, सुरेंदर (हरियाणा), दर्शन (दिल्ली).

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply