पनवेल : बातमीदार
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प उभारणार्या जीव्हीके पॉवर अॅण्ड इन्फ्रा कंपनीला 16 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यास एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पातील धावपट्टी व टर्मिनल्स एल अॅण्ड टी कंपनी करणार असल्याने सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विमानतळावरून पहिल्या उड्डाणाला आता 2022 उजाडणार आहे. नवी मुंबई विमानतळ उभारणीचे काम मुंबई विमानतळाचे नूतनीकरण करणार्या जीव्हीके कंपनीला निविदाद्वारे देण्यात आले आहे. फ्रान्सच्या लेड कंपनीला सोबत घेऊन जीव्हीकेने मुंबई इंटरनॅशनल विमानतळ कंपनी स्थापन केली असून वित्तपुरवठ्यासाठी ही कंपनी गेली अनेक महिने वित्त संस्थांच्या संपर्कात होती. यात एशियन इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँक तसेच देशातील दोन अग्रगण्य खासगी बँकांचा समावेश आहे. दहा गावे मोकळी होत नाहीत तोपर्यंत वित्तपुरवठा करण्यास काही वित्त संस्थांची तयारी नव्हती. अखेर एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम चार ते साडेचार हजार कोटींपर्यंत राहणार आहे. वित्तपुरवठ्याची मोठी समस्या असलेल्या बांधकाम कंपनीला हा मोठा दिलासा असून येत्या काही महिन्यांत उपबांधकाम कंपनी एल अॅण्ड टी कामाला सुरुवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पातील पहिल्या विमानाचे उड्डाण यावर्षी होणार असे केंद्र व राज्य सरकारने जाहीर केले होते. आता बांधकाम कंपनीला आवश्यक असलेला सुरुवातीचा वित्तपुरवठा करण्याची अटी व शर्तीना आधीन राहून एसबीआय बँकेने तयारी दर्शवल्याने किमान या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात कामाला आता सुरुवात होणार आहे.