केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणार्या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सन 2020 पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण झालेली दिसून येतील व दिघी बंदरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे 3500 कोटीची गुंतवणूक असणारा आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराचा विकास करण्यावर भर दिला जात असून, तातडीने या बंदराला आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर प्रशासनाचा जोर दिसून येत आहे.
आगरदांडा येथून मोठ्या जहाजातून उतरणारा माल विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिट चौपदरीकरण करण्याचे काम वेगात सुरू असून, किमान 60 टक्के चौपदरी रस्त्याचे काम आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. सावली ते मांदाड पुलापर्यंतचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे, तर तळे ते इंदापूरचे सुद्धा काम प्रगतिपथावर आहे. आगरदांडा हे गाव फार पूर्वीपासून वसलेले असून चौपदरी रस्त्यामुळे येथील स्थानिक घरांना धक्का पोहचू नये यासाठी एक भला मोठा डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्गदवारे थेट कंपनीच्या मेन गेटपासून रस्ता तयार करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे आगरदांडा येथून रोहा येथे रेल्वे रूळ टाकण्याचा सुद्धा बंदर विकासात समावेश असून, यासाठी पुढील टप्यात हे काम मार्गस्थ होणार आहे.
सदरचे बंदर जेएनपीटी हस्तांतरित करणार असा कल होता, परंतु आता सदरचे बंदर अदानी गुप ऑफ इंडस्ट्रीज घेणार असल्याचे दिघी पोर्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासाठी लागणार्या सर्व पूरक बाबी तातडीने पूर्ण करण्याचा केंद्र शासनाचा कल असून काँक्रीट रस्त्याप्रमाणे लवकरच रेल्वे विकासाचे काम सुद्धा मार्गी लागणार आहे.जहाजातून उतरवलेला माल रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजित ठिकाणी पोहचवण्यासाठी पूरक मार्ग पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंदित केले जात आहे. दिघी आगरदांडा बंदर संपूर्ण विकसित झाल्यावर मुरुड तालुक्याचे महत्त्व वाढणार असून औद्योगिक क्रांती झालेली दिसून येणार आहे. स्थानिकांना रोजगार त्याचप्रमाणे विविध ट्रेंड असणार्या लोकांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार आहे. जहाजातून माल उतरवण्याची लागणारी विविध पदेसुद्धा येथे भरली जाणार आहेत. त्यातच अदानी ग्रुपने हे बंदर घेतल्याने विकासाला अधिक चालना मिळाली असून, या बंदराच्या विकासावर केंद्र शासन कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक करून एक मोठे विशाल बंदर विकसित करीत आहे. या बंदराच्या विकासामुळे स्थानिकांना चांगले रस्ते त्याचप्रमाणे रेल्वे सुविधेचाही फायदा मिळणार आहे.रस्त्याची कामे पूर्ण होताच रेल्वे कामाला गती मिळणार आहे. सदरचे बंदर लवकरच विकसित होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा येथील सुशिक्षित तरुणांनी व्यक्त केली आहे.
सध्या दिघी पोर्टचे काम सुद्धा काही अंशी पूर्ण झाले असून, येथे तुरळकच जहाजे येताना दिसतात, परंतु आगरदांडा बंदराचा विकास झाल्यास मोठ्या जहाजांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे बंदराच्या विकासामुळे मुरुड तालुक्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाने वेग घेतल्याने आगरदांडा बंदर विकासाचे ओढ निर्माण झाली असून बदलत्या घडामोडीमुळे लवकरच या बंदराचा विकास झालेला पाहावयास मिळणार आहे
जेएनपीटीच्या धर्तीवर आगरदांडा व दिघी परिसरात बंदराच्या विकासाचे काम सुरू असून काँक्रीट चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण होताच आगरदांडा येथे रेल्वे रूळ आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले जाणार असून यासाठी केंद्र सरकारची सुद्धा परवानगी घेण्यात आली आहे. आगरदांडा येथून रेल्वे रूळ रोहा येथे सगन करून मोठ्या मालाची वाहतुकीस प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात औद्योगिक क्रांती होणार असून स्थानिक लोकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. नोकरीबरोबरच त्यांच्या जागांना सुद्धा उत्तम भाव मिळणार आहे. मलेशिया, जपान, इंडोनेशिया आदी ठिकाणाहून भारतीय कंपन्यांना लागणारा कच्चा माल या बंदरातून वाहतूक होणार असल्याने हे बंदर सुद्धा औद्योगिकदृष्ट्या विकसित होणार आहे, सदरचे बंदर अदानी कंपनीने घेतल्यानंतर येथे मोठ्या घडामोडी घडत असून विकास कंकणही रेलचेल सुरु झाली आहे. स्थानिकांच्या पात्रतेप्रमाणे बंदर विकासास मदत होऊन येथील स्थानिकांना नोकरीत प्रथम प्राधान्य मिळणार असल्याने या बंदर विकास लवकरात लवकर व्हा वा अशी असंख्य नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे. रस्ते, रेल्वे यांचे नेटवर्क प्रबळ झाल्यास मुरुड तालुक्याचा मोठा विकास होणार आहे.
-संजय करडे