Breaking News

पाण्याची घंटा योग्यच

अनेकदा, एखाद्या तहानलेल्या मुलाने वर्गात पाणी पिऊ का असे विचारल्यावर शिक्षकांकडून ‘सुटीत का नाही प्यायलास, आता तास पूर्ण झाल्यानंतरच पिता येईल’ वगैरे शिस्तीच्या नावाखाली सुनावले जाते. हे असे होण्याऐवजी सर्व मुलांना एकत्रितपणे पाणी प्यायला विशिष्ट वेळ नेमून देणे मुलांकरिता सोयीचेच ठरेल.

अडीच-तीन वर्षांच्या मुलांना आताशा शाळेत धाडले जाते ते मुळात त्यांच्या ‘यशस्वी’ आयुष्याची उभारणी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पहिले पाऊल असा हेतू मनात ठेवूनच. येथे यशस्वी हा शब्द महत्त्वाचा आहे. हे वाक्य आनंदी आयुष्याची किंवा आरोग्यदायी आयुष्याची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी असे बदलणे फारसे कुणालाच शक्य होणार नाही. जगण्यातील प्राधान्यक्रमात सगळ्यांनीच नकळत यशाला आनंद वा आरोग्याच्या आधीचे स्थान कधीचेच बहाल केले आहे. यशामुळे जगण्यात आनंद येतो असे सुप्त गृहितकही त्यामागे आहेच. मोठ्यांची ही विचारसरणी अर्थातच लहानग्यांचे जगणेही कमालीचे प्रभावित करते. निव्वळ खेळले-बागडले तरी खूप काही शिकता येईल अशा संवेदनशील वयात मग मुले शाळेतील लेखनकामाला जुंपली जातात. शाळेखेरीज इतर अनेक गोष्टी शिकण्याच्या उपक्रमांचा बोजाही यशाच्या मागे धावणारी जीवनशैली या लहानग्यांवर लादते. आठ-दहा वर्षांचे मूल मग त्याची स्वत:ची काही आवडनिवड विकसित होण्याच्या वा विचारली जाण्याच्या आधीच एखादे वाद्य वाजवायला शिकू लागते, चित्रकलेच्या वर्गाला जाते, स्केटिंग वा तत्सम खेळाच्या प्रशिक्षणालाही जाते. अनेकानेक परीक्षांच्या ओझ्याखाली दबलेली ही मुले जिथे कुठे त्यांना मूल होऊन बागडण्याची संधी मिळेल तिथे मग खेळून घेताना दिसतात. शाळेच्या सुटीत डबा अर्धामुर्धाच खाऊन ती खेळायला पळतात. खाण्याची आठवण नाही तर पाण्याची कुठून व्हायला. मुलांनी वेळेवर आणि सकस आहार घ्यावा, पुरेसे पाणी प्यावे या गोष्टी जगण्याचा स्वाभाविक भाग म्हणून यायला हव्या असताना त्याही आता शिस्तीचा भाग म्हणून राबविण्याची वेळ आलेली दिसते. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये शाळेत ‘वॉटरबेल’ म्हणजे पाण्याची घंटा असा खास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लहानगी शाळकरी मुले पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांच्यामागे आरोग्याच्या काही विशिष्ट समस्या लागतात असे आढळून आल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. अर्थातच मुलांना आवर्जून पाणी प्यायला लावल्याने अनेक मुलांना त्याचा लाभच होईल व विशिष्ट वेळाने पाणी पिण्याची चांगली सवयही त्यांना लागेल. अशी लागलेली सवय सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी सोबत करते. त्यामुळे हा उपक्रम चांगलाच आहे. खेरीज अभ्यास थांबवून ही घंटा होणार असल्यामुळे अभ्यास महत्त्वाचाच, परंतु पाणी पिणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे हाही एक मोलाचा संस्कार त्यातून मुलांच्या मनावर रुजणार आहे. एरव्ही पंधरा-वीस मिनिटांच्या सुटीत मुलांनी खाणे, पिणे, टॉयलेटला जाणे सारे काही उरकावे अशी शिक्षकांची अपेक्षा असते, परंतु मुलांच्या मोठ्या संख्येमुळे टॉयलेटला जाणे सगळ्यांनाच शक्य होत नाही आणि त्यामुळेच पाणी पिणे टाळले जाते असेही होताना दिसते. शाळांमधील स्वच्छतागृहांची वाईट स्थिती हेही कारण ग्रामीण भागात वा शहरांमध्ये पालिका शाळांमध्ये दिसून येते. या सार्‍याच परिस्थितीत वॉटरबेलचा हा कित्ता राज्यातीलही काही शाळा गिरवू पाहात आहेत हे उत्तमच आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply