Breaking News

वीजचोरी करणार्यांविरोधात गुन्हे भरारी पथकाची तळोजात कारवाई

पनवेल ः बातमीदार 

महावितरणच्या वाशी आणि कल्याण येथील भरारी पथकाने तळोजा गावात एका दिवसामध्ये विविध ठिकाणी धाड टाकून घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणार्‍या सात ग्राहकांवर कारवाई केली आहे. या ग्राहकांनी महावितरणच्या हजारो युनिटच्या विजेची चोरी करून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशी येथील भरारी पथकाचे प्रमुख अ‍ॅडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर शशांक पानतावणे व कल्याण येथील अ‍ॅडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर धनंजय सातपुते यांच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी 18 नोव्हेंबरला तळोजा गावात धाड टाकली होती. या वेळी तळोजा गावातील उमरमिया मैनुद्दीन पटेल यांच्या घरगुती मीटरची एक्युचेक मशीनद्वारे तपासणी केली असता त्यांच्या मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्यामुळे वीजवापराची नोंद 71 टक्के मंदगतीने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पटेल यांनी 24 महिन्यांमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीची 6648 युनिटची चोरी केल्याचे आढळून आले, तर सरफराज मैनुद्दीन पटेल यांच्या घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार केल्याने हे मीटर 78 टक्के मंदगतीने चालत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मैनुद्दीन पटेल यांनी गेल्या 24 महिन्यांपासून 38 हजार 350 रुपयांची 2469 युनिटची वीजचोरी केल्याचे उघड झाले.

तसेच येथील मुनाफ पटेल यांनी त्यांच्या घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार केल्यामुळे त्यांचे विद्युत मीटर 72 टक्के मंदगतीने फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुनाफ पटेल यांनी 24 महिन्यांत सुमारे 69 हजार रुपये किमतीची 4591 वीज युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. दस्तगीर पटेल यांनी वीजमीटरमध्ये फेरफार केल्याने त्यांनी गेल्या 24 महिन्यांमध्ये तब्बल एक लाख तीन हजार 880 रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. मोहम्मद हुसेन पटेल आणि सईद ढेखालिया यांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून गेल्या 24 महिन्यांमध्ये सुमारे 75 हजार रुपये किमतीची 6070 इतक्या वीजयुनिटची चोरी केल्याचे आढळून आले.

पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

मो. अब्बास मो. हुसेन पटेल आणि मोहम्मद मुख्तार शेख यांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून सुमारे 30 हजार रुपये किमतीची 2446 युनिट इतक्या विजेची चोरी केल्याचे आढळून आले, तसेच तळोजा गावातील मो. अब्बास मो. हुसेन पटेल व मोहम्मद शहादत शेख यांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून गेल्या 24 महिन्यांमध्ये 68 हजार रुपयांची 5560 युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे महावितरणच्या दोन्ही भरारी पथकांनी सात ग्राहकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply