पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरून पुढे चाललेला ट्रेलर अचानक थांबल्याने पाठिमागून वेगात आलेली एसटी बस ट्रेलरच्या मागील भागावर जोरात आदळली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी जखमी होऊन एसटी बसचे नुकसान झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला.
ट्रेलर (एमएच-43,बीजी-9498) गोवा- मुंबई महामार्गाने नागोठणे ते कळंबोली असा जात होता. ट्रेलरच्या पुढे जाणार्या टँकर चालकाने ब्रेक दाबून टँकर थांबिवल्यामुळे ट्रेलर चालकानेही अचानक ट्रेलर थांबविला. त्यामुळे ट्रेलरच्या मागून येणारी एसटी बस (एमएच-20,बीएन-2747) ट्रेलरच्या मागील भागावर आदळली. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार शिंदे करीत आहेत.