अलिबाग : प्रतिनिधी
पेण येथे 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 16 दिव्यांग संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनंचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिली.
दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा रायगडला यजमानपद मिळाले आहे. या स्पर्धेसाठी रायगड दिव्यांग क्रिकेट क्लबचे सदस्य तयारी करीत आहेत. या स्पर्धेत रायगडचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मे 2017 मध्ये राज्यस्तरीय क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेत रायगड संघ उपविजेता ठरला होता. 2018 साली रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगडाने विजेतेपद पटकावले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन फोर दि डिसेब्लब आयोजित 19 व्या मुंबई महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगड संघाने कल्याण संघाचा पराभव करीत विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत आपल्या घरच्या मैदानावर रायगडचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.