मोहोपाडा ः वार्ताहर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेस बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांनी व पोलीस पाटलांनी दक्षता घ्यावी, यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभामंडपात शुक्रवारी दुपारी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी सांगितले की, कोणत्याही सणांवर पायबंध घालण्याचा हेतू नसून अनावधानाने नवरात्रोत्सव मंडळांकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडू नये, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. मंडळाने आपला अर्ज महाराष्ट्र पोलीस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन भरावा.ध्वनिक्षेपकाची तीव्रता शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत असावी. विसर्जन मिरवणूकही योग्य वेळेत सुरू करून योग्य वेळेतच संपवावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केल्या.