महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार
नागोठणे : प्रतिनिधी
महावितरणच्या पाली विभागाअंतर्गत येणार्या बाहेरशिव (ता. रोहा) येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा रोहा तालुक्यातील बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021पासून शाळा बंद आहे. या दरम्यान शाळा प्रशासनाने विजेची देयके न भरल्याने महावितरणने शाळेचा वीजमीटर काढून नेला आहे. त्यानंतर शाळा प्रशासनाने पुन्हा वीज मीटर घेतलेला नाही. त्यामुळे शाळेमध्ये आजतागायत कोणत्याच प्रकारचा विजपुरवठा झालेला नाही. असे असतानादेखील शाळेला जुलै ते ऑगस्ट 2022 या महिन्याची वीज देयके पाठवण्यात आली आहेत. या वीज देयकांमध्ये शाळेने वीज वापर केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे जून महिन्यात 200 तर ऑगस्ट महिन्यात 460 रुपयांचे बील देण्यात आले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी महावितरणच्या पाली (ता. सुधागड) येथील अभियंत्यांना अर्ज लिहून घडल्या प्रकारची माहिती दिली आहे. सदर बील पुन्हा पाठवले जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी व दिलेले बील रद्द करण्यात यावे, अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
कोरोना कालावधीत शाळा बंद होती. त्या दरम्यान महावितरण कर्मचार्यांनी आमच्या शाळेचे मीटर काढून नेले. आजतागायत आमच्या शाळेला कोणत्याही प्रकारचे वीज मीटर नाही. मात्र वीजबील येत आहे.
-सविता पाटील, मुख्याध्यापिका, रायगड जिल्हा प्राथमिक शाळा बाहेरशीव