पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वतःचे नाव टाकल्याचे उघड
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/12/bangladeshi-768x1024.jpg)
पनवेल : बातमीदार
बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरोक्स काढून त्याच्यावर स्वतःचे नाव त्याने टाकले होते. चिखले गावात घरजावई म्हणून राहत असलेला इनामुल मुल्ला हा मनोहर राहू पवार या नावाने वावरत होता. त्याच्या नावावर चिखले येथे घर देखील आहे. त्याला पारस आणि श्लोक नावाची दोन मुले असून ती कोन येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. या बांगलादेशीकडे म्हणजेच मनोहर राहू पवार या बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र सापडून आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याचा गुन्हा दाखल करून शासकीय कार्यालयांना पत्रे लिहून त्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार चिखले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने तो शाळा सोडल्याचा दाखला शाळेने दिला नसल्याचे तालुका पोलिसांना सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेने मनोहर पवार (ईनामुल मुल्ला) याची पत्नी त्याच शाळेत शिकलेली असल्याने त्याच्या पत्नीला शाळा सोडल्याचा दाखला दिला होता. त्याचा गैरवापर करून इनामुल याने त्याची झेरॉक्स काढून त्यावर व्हाइटनर लावले व स्वतःचे नाव टाकले होते. व त्याची पुन्हा झेरॉक्स काढून ठेवली होती. शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स काढून त्याने ती प्रत इतर कागदपत्रे बनविण्यासाठी वापरली. तर ग्रामपंचायतने मनोहर पवारच्या नावावर असलेल्या घराची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने हे घर विकत घेतलेले आहे. तर रेशन कार्ड काढण्यासाठी देण्यात आलेल्या अॅफेड्याव्हीटवर चिखले गावातील एका व्यक्तीने मनोहर राहू पवार याला ओळखतो म्हणून सही केलेली आहे. या वेळी बांगलादेशीला मदत करणार्यावर कारवाईचा फास आवळला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तीस इतर कागदपत्रे बनवून देण्यासाठी जे एजंट होते. तसेच तहसील व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी होते त्यांचा शोधसुद्धा सुरू असल्याचे समजते.