मुरूड : प्रतिनिधी
इंधन बचत केल्याबद्दल पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, तेल व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या तर्फे मुरुड एसटी आगाराला 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. 16) होणार्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे व त्यांच्या सहकार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एसटी वाहतूक ही मुख्यत: डिझेलच्या साहाय्याने केली जाते. चालकांचा तरबेजपणा व तांत्रिक विभागाच्या योग्य देखभालीमुळे मुरुड आगाराने ऑक्टोंबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत इंधन वाचवून सदरचा 50 हजार रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. सदर एक वर्षाच्या कालावधीतील कामगिरी पाहून मुरूडसह श्रीवर्धन व पेण या आगारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात
आली आहे.
एसटीच्या मुरुड आगाराने इंधनात बचत केली, त्याचे सर्व श्रेय चालक व तांत्रिक विभागातील कामगारांना आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला सदरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढील वर्षातही इंधन बचत व उत्पन्नात वाढ करून आमचे आगार सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
-सनील वाकचौरे, आगार प्रमुख, मुरूड