Breaking News

तरुण मतदारांवर मदार!

यंदाच्या निवडणुकीतील तरुणांच्या प्रचंड संख्येमुळेच कौशल्यविकास, उच्चशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी हे मुद्देही राष्ट्रीय सुरक्षेच्या ठळक मुद्द्याइतकेच महत्त्वाचे मानले जात आहेत. निवडणुकीबद्दल तरुणांमध्ये कमालीची जागरुकता दिसत असून कित्येक सर्वेक्षणांमध्ये तरुणांनी मतदान हे आपले कर्तव्य असून ते बजावणे वास्तवत: बंधनकारकच असायला हवे अशी भावनाही व्यक्त केली होती. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळेच आरक्षणाचा मुद्दाही यंदा महत्त्वाचा बनला आहे.

अवघ्या जगभरातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया गणल्या जाणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. यंदाच्या या सार्वत्रिक निवडणुकीचे वैशिष्ट्य हे आहे की एकूण मतदारांपैकी दोन तृतियांश मतदार हे 35 वर्षांखालील आहेत. 2014 मध्ये 2 कोटी 40 लाख इतक्या तरुणांनी पहिल्यांदा मतदान केले होते. या आकडेवारीमुळेच यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत तरुण मतदारांनी मतदान करणे हे आत्यंतिक महत्त्वाचे मानले जात आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 91 मतदारसंघांत मतदान झाले. राज्यात विदर्भातील 10 पैकी 7 मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश होता. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार परवापर्यंत अपेक्षेप्रमाणे टिपेला पोहोचला होता. याच टप्प्यात आंध्र प्रदेश, सिक्किम तसेच ओडिशातील विधानसभा निवडणुकांसाठी देखील मतदान झाले. या पहिल्या टप्प्यातच उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील आठ मतदारसंघांत मतदान झाले. या मतदारसंघांत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल यांचे गठबंधन खरोखरच प्रत्यक्षात उतरते का, याची ही पहिली चाचणी मानली जाते आहे. ईशान्येकडील आठ राज्यांतील एकंदर 25 पैकी 14 मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. सर्व सात टप्प्यांसाठीचे मतदान पार पडल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे व ती वापरण्यात विशेषत: तरुणवर्ग आघाडीवर असल्यामुळे तरुणांच्या राजकीय जागरुकतेत गेल्या काही वर्षांत बरीच वाढ झाल्याचे दिसून येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेकदा तरुणांशी संवाद साधला होता. आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रारंभी देखील त्यांनी ट्वीट करून विशेषत: तरुण व प्रथमच मतदान करणार्‍या मतदारांना मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले. या पहिल्या टप्प्यातील मतदानात 14 कोटी मतदार 1279 उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून एकंदर परिस्थिती एनडीएला अनुकूल दिसते आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. दिवसाअखेरीस हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात 55.78 टक्के इतके मतदान झाले. समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे राजकीय जागरुकता वाढली असली तरी कित्येक मतदारांना प्रवास करून मतदानासाठी आपले मूळ गाव गाठणे अनेक कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरच डिजिटल मतदानाचा पर्याय उपलब्ध व्हायला हवा अशी मागणीही मूळ धरू लागली आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply