उदयनराजेंचे टीकास्त्र; सोयीचे राजकारण करीत असल्याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे नेते व सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, असे बोल सुनावत उदयनराजेंनी शिवसेनेवर पलटवार केला. महाशिवआघाडीतील ’शिव’ का काढून टाकले, असा सवाल करतानाच महाराजांचे नाव घेत असाल, तर त्याप्रमाणे वागा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोईचे असेल, तेव्हा महाराजांचे नाव घ्यायचे आणि सोईचे नसेल तेव्हा ते काढून टाकायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला. वादग्रस्त पुस्तकावर आता वंशजांनी बोलावे या संजय राऊत यांच्या विधानाची गंभीर दखल घेत उदयनराजेंनी संजय राऊत आणि शिवसेनेवर आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आले होते का, असा सवाल त्यांनी केला. शिववडा, हे वडा तो वडा. छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान आहे आणि तुम्ही वडापावला महाराजांचे नाव देता, अशा शब्दांत उदयराजेंनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंनी काही शिवसेना भवनाचे फोटो दाखवले. या फोटोत शिवसेना भवनाच्या इमारतीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वरच्या बाजूस, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो खालील बाजूस होता. या फोटोत महाराज कुठे आणि बाळासाहेब ठाकरे कुठे, असे म्हणत शिवसेनेने महाराजांचा अपमान केल्याचे उदयनराजेंनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील आमदार गजभिये मुजरा करत असतानाचा फोटोही दाखवला. काही लोक गळ्यात पट्टे बांधलेले असतात. ते लुडबुड करीत असतात असे म्हणत मला कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे करायचे नाही. तो मोठा कधीच नव्हता… हा ब्लेम गेम सुरू आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले.