रांगेत उभे राहून भाविकांनी घेतले बल्लाळेश्वराचे दर्शन
पाली : प्रतिनिधी
संकष्टी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये बुधवारी (दि. 22) भाविकांची गर्दी उसळली होती. भाविकांनी रांगेत उभे राहून बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. हार, नारळ व प्रसादाची दुकाने तसेच हॉटेल्स गजबजली होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने उभी करण्यासाठी देवस्थानचे दोन मोफत वाहनतळदेखील आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
-अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुककोंडी झाली होती. मात्र पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालीतील प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.