Breaking News

उंच माझा झोका…

काही लंडन आय हा चक्री पाळणा गेली वीस वर्षे सुरू आहे. या चक्री पाळण्याच्या उभारणीसाठी 1999 साली ब्रिटिश सरकारची तब्बल 8 कोटी पौंड इतकी महाप्रचंड रक्कम खर्ची पडली होती याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना असायला हवे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीतून आकर्षक पर्यटन स्थळ उभे राहिलही परंतु त्या आधी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा नष्ट करणे अधिक प्राधान्याचे नव्हे काय? पर्यटनस्थळे उभी करूच नयेत असे कोणी म्हणणार नाही.

‘बांधू हवेत किल्ला, बांका बुलंद यंदा’ या कविवर्य सुरेश भटांच्या सुप्रसिद्ध गझलेची आठवण यावी असा कारभार सध्याच्या महाराष्ट्रातील तीन चाकी सरकारने सुरू केलेला दिसतो. गेल्या दीड महिन्यात उद्धव ठाकरे सरकारने घोषणांचा सपाटा लावला असून प्रत्यक्षात कामाच्या दिशेने गाडे इंचभर देखील पुढे सरकलेले दिसत नाही. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपयांची किमान मदत ठणकावून मागणार्‍या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसताक्षणी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. नागपूर अधिवेशनामध्ये अगदी शेवटच्या दिवशी शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीची घोषणा ठाकरे सरकारने ‘करून दाखवली’. परंतु त्यातील एक नवा पैसा देखील अद्याप शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेला नाही. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान तर हे सरकार पार विसरून गेले आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारातील मंत्र्यांचे अजून धड बस्तान देखील बसलेले नाही. मंत्र्यांचे बंगले, त्यांची कार्यालये, त्यांच्या सचिवांची कार्यालये यांच्या रंगरंगोटीत आणि सुशोभिकरणात करदात्यांचे काही कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. त्यातच आता सपाटा सुरू झाला आहे तो आकर्षक आणि लोकानुनयी घोषणांचा. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाची उंची साडेतीनशे फुटांनी वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जाहीर केला. यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासनही दिले. याशिवाय, एका नव्या घोषणेनुसार मुंबई महानगरीत आता आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. ‘लंडन आय’ या लंडनमधील सुप्रसिद्ध चक्री पाळण्याच्या धर्तीवर मुंबईत देखील उंत्तुंग असा ‘मुंबई आय’ नावाचा चक्री पाळणा उभा करण्याचे आश्वासन सरकारने दिले असून यामुळे मुंबईमध्ये पर्यटकांची रीघ लागेल असा दावा आहे. ‘लंडन आय’च्या धर्तीवर जगभरात काही मोजक्या आतंरराष्ट्रीय शहरांमध्ये असे चक्री पाळणे आहेत. पर्यटकांची भरपूर गर्दी ते देखील खेचत असतात हे तितकेच खरे आहे. सिंगापूर येथे अशाच प्रकारचा भव्य चक्री पाळणा सिंगापूर फ्लायर या नावाने ओळखला जातो व तेथे पर्यटकांची सदैव रांग लागलेली असते. असे असले तरी ती सारी यंत्रणा प्रचंड महागडी असते. त्याच्या देखभालीचा खर्च देखील तितकाच अफाट असतो हे विसरून चालणार नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदीजींच्या पाठबळामुळे उभ्या राहिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिभव्य स्मारकाचा समावेश आता जगातील आठ आश्चर्यांमध्ये झाला आहे. वल्लभभाईंचे स्मारक हे एक कलात्मक आणि अस्मितादर्शी आश्चर्य आहे. परंतु ‘मुंबई आय’सारखा चक्री पाळणा उभारणे हे निव्वळ बाजारू आणि निरर्थक असा उद्योग ठरण्याची शक्यताच अधिक. आपले अग्रक्रम ठरवून ठाकरे सरकारने खर्च करावा ही जनतेची अपेक्षा रास्त मानावी लागेल.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply