अध्यक्ष विवेक पाटलांसमोर व्यक्त केला संताप
खारघर : प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती झाली असून, संतप्त ठेवीदारांनी बँकेच्या खारघर येथील शाखेत बुधवारी (दि. 29) ठिय्या आंदोलन करून विवेक पाटील यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला.
कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना मागील अनेक दिवसांपासून त्यांचे स्वत:चे व हक्काचे पैसे दिले जात नसल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठेवीदारांना बुधवारी पैसे दिले जातील, असे आश्वासन कर्नाळा बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते, मात्र ऐनवेळी सोमवारी पैसे दिले जातील, असे सांगण्यात आल्याने खारघरमधील बँकेतच ठेवीदारांनी ठाण मांडले. पैसे घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही, असा पवित्रा ठेवीदारांनी घेतल्याने बँकेचे अध्यक्ष विवेक पाटलांना खारघरमधील शाखेत यावे लागले. घोटाळा उघडकीस येऊनही विवेक पाटलांच्या अरेरावीच्या स्वभावात तीळमात्र फरक पडलेला नाही हे त्यांनी ठेवीदारांना दिलेल्या वागणुकीवरून दिसून आले, पण संयमाचा बांध फुटलेले ठेवीदारही पैसे मिळत नसल्याने भडकले होते. त्यांना समजावताना विवेक पाटलांना चांगलाच घाम फुटला.
पैसे मिळेल या आशेने आलेले चंद्रकांत माने यांनी सांगितले, सायंकाळी 4 वाजल्यापासून बँकेत होतो, पण मॅनेजर काहीच बोलत नव्हता. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न पडला. कर्नाळा संघर्ष समितीचे मनोज सावंत म्हणाले, रात्रीचे 9.30 वाजले तरी खातेदार पैसे मिळतील या आशेने बसले होते. त्यावर बँक व्यवस्थापक सचिदानंद शेणॉय यांनी काही कारणास्तव आज रोकड उपलब्ध झाली नाही. सोमवारी पैसे उपलब्ध होतील, असा निरोप बँक संचालकांकडून आल्याचे सांगून वेळ मारून नेली. आता दिलेल्या आश्वासनानुसार तरी पैसे मिळणार का, या प्रतीक्षेत ठेवीदार आहेत.