कर्जत ः प्रतिनिधी
आपला भारत एकमेव असा देश आहे की, एखादी महिला गरोदर राहिल्यावर तिची शासकीय स्तरावर काळजी घेतली जाते. माता आणि बाळ सुदृढ असावे यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या महिला सहकार्यांनीही वाडी-वस्तीवर जाऊन तेथील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 26) येथे केले. भाजप कर्जत शहर उपाध्यक्ष शर्वरी कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या समारंभास महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा समन्वयक शैला शारबिद्रे, माजी प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, शहराध्यक्ष बळवंत घुमरे, युवा नेते किरण ठाकरे, संजय कराळे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, महिला शहराध्यक्ष स्नेहा गोगटे, दिनेश सोलंकी, सरस्वती चौधरी, स्मिता घरलुटे, दिगंबर कांबळे, संतोष कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, अडीच वर्षे महाराष्ट्र भकास होता. तो विकासात्मक महाराष्ट्र करण्यासाठी आपले दोन्ही शिलेदार दिवस-रात्र एक करून अगदी 18 तास काम करीत आहेत. येत्या निवडणुकीत भाजपचे दीडशे आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी लोकांपर्यंत आपल्या नेत्यांच्या भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. आताच्या तरुण मुलांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहिले आहे. त्यांचे काम ते पहात आहेत. मोदी, कमळ आणि भाजप घराघरात पोहचविले पाहिजे. त्याकरिता विविध योजना लोकांपर्यंत घेऊन जा.अश्विनी पाटील यांनी, या कार्यालयात प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडविण्याचे काम झाले पाहिजे. महिलांना एकत्र करून एकजुटीने काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे म्हटले. सुरुवातीला शर्वरी कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात हे संपर्क कार्यालय माझे नसून सर्वांचे आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन वैद्य यांनी केले.