Breaking News

आता लक्ष्य ‘व्हाइट वॉश’चे

भारत-न्यूझीलंडमधील अंतिम टी-20 सामना आज

हॅमिल्टन : वृत्तसंस्था
सलग दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडवर सुपर ओव्हरमध्ये मात केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. भारताकडे या मालिकेत सध्या 4-0 अशी विजयी आघाडी आहे. मालिकेतला अखेरचा सामना रविवारी (दि. 2) खेळवला जाईल. या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल, तर यजमान संघ शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करेल.
वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाकडून मनीष पांडेने फलंदाजीदरम्यान नाबाद अर्धशतक झळकावत, तर गोलंदाजीत नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्त्वाची षटके टाकत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकांत शार्दुलने केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर सलग दुसर्‍या सामन्यात भारताने सुपर ओव्हरवर विजय मिळवला.
वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारित षटकांमध्ये 165 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा 14 धावांचे आव्हान सहज पार करीत विजय मिळवला.
जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरचे षटक टाकताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टला माघारी धाडण्यात भारताला यशही आले. तरीही मुनरो व इतर फलंदाजांनी फटकेबाजी करीत भारतासमोर 14 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल भारताकडून लोकेश राहुलने फटकेबाजी करीत पहिल्या दोन चेंडूंमध्येच 10 धावा केल्या. तिसर्‍या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल माघारी परतला, परंतु कर्णधार विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने विजयी लक्ष्य पार करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता ‘किवीं’वर निर्भेळ वर्चस्व गाजविण्याची ‘विराटसेने’कडे संधी आहे.
टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply