नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.
देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा क्रिकेट सल्लागार समितीकडेच असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.
मदनलाल हे 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य, भारताचे माजी प्रशिक्षक, तसेच वरिष्ठ गटाच्या निवड समितीचे माजी सदस्य आहेत. आर. पी. सिंग 2007च्या ट्वेन्टी-20 विश्वविजेत्या संघाचा सदस्य राहिलेला आहे, तर सुलक्षणा नायक यांनी भारताचे 11 वर्षे प्रतिनिधित्व करताना दोन कसोटी, 46 एकदिवसीय आणि 31 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत.
Check Also
कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …