Breaking News

युवा विश्वचषक : भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत भिडणार

केपटाऊन : वृत्तसंस्था
जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची वाट पाहत असतात तो सामना अखेरीस निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. 4) हा सामना रंगणार आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर सहा गडी राखून मात करीत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तानला 189 धावांवर बाद केल्यानंतर विजयासाठीचे 190 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सहज पार केले.
पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने 2018 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. भारतीय संघाने त्या वेळी 203 धावांनी सामना जिंकला होता. भारताने 50 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकचा संघ केवळ 69 धावांवर गारद झाला होता.
सध्या सुरू असलेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ एकही सामना न गमावता उपांत्य फेरीपर्यंत येऊन पोहचले आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात कोणता संघ बाजी मारून अंतिम फेरीत धडक मारतो, याकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply