पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत पुन्हा एकदा गव्हाण विद्यालय झळकले. संस्थेच्या नावडे येथील शाखेत झालेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत चमकदार यश संपादन केले. मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांतून झालेल्या गटनिहाय स्पर्धेत लहान गटात गव्हाण विद्यालयाची गौरी दुर्गाराम चौधरी या विद्यार्थिनीने हिंदी भाषेत प्रथम क्रमांक पटकाविला. याच गटात स्मीत कुंदन मोकल या विद्यार्थ्यांने मराठी भाषेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर इंग्रजी भाषेत अनुष्का राजेंद्र आव्हाड हिला चौथा क्रमांक प्राप्त झाला. माध्यमिक गटात मराठी भाषेत दीक्षा रमेश वर्तक व हिंदी भाषेत मंजिता धर्मेंद्र गोस्वामी या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक तर उच्च माध्यमिक गटात रूपाली वैजिनाथ मंजुळकर या विद्यार्थिनीने इंग्रजी भाषेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. संस्थेच्या रायगड विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर व सहायक विभागीय अधिकारी शहाजीराव फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नावडे येथील विद्यालयात या स्पर्धा झाल्या. गव्हाण शाखेचे ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रा. राजेंद्र चौधरी, माध्यमिक विभागाचे प्रसन्न ठाकूर व लहान गटासाठी हर्षला पाटील या तीन शिक्षकांना मराठी भाषेसाठी विभागीय स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विजेत्या स्पर्धकांना विद्यालयाचे प्राचार्य आणि रायगड विभागीय सहायक विभागीय अधिकारी शहाजीराव फडतरे व गव्हाण शाखेचे उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, नावडे शाखेचे उपमुख्याध्यापक गोडगे सर, पर्यवेक्षक मोहिते सर, एच.एन.पाटील, नावडे शाखेचे लेखनिक शिर्के सर, आय.टी.आय. चे ताटे सर तसेच प्रा.सौ. ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी संस्थेचे लाईफ मेंबर व न्हावे शाखेचे शाखाप्रमुख प्रमोद कोळी उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना मार्गदर्शन करणारे भाषाध्यापक तसेच विद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धा विभागाचे प्रमुख सागर रंधवे, सहायक यु.ए.म्हात्रे व हर्षला पाटील, ज्युनिअर कॉलेजचे स्पर्धाप्रमुख प्रा. राजेंद्र चौधरी व सहायक प्रा. जयवंती ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. सर्व विजेते स्पर्धक व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. वक्तृत्व व गायन स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर सन्मान करण्यात आला.