मोहोपाडा ः प्रतिनिधी : वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालयाजवळील पाताळगंगा नदीकिनारी श्री विरेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे काम 12 वर्षांनंतर पूर्णत्वास आले आहे. या मंदिरातील शिवलिंग, नंदी, पार्वती, गणपती, विष्णू, लक्ष्मी, नाग, गोमुख, कासव व बारा ज्योतिर्लिंग भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वाशिवलीतील ग्रामस्थांनी पाताळगंगा नदीकिनारी श्री विरेश्वर मंदिर साकारले असून निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर भक्तांचे आकर्षण ठरत आहे. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वाशिवली गावातून मूर्तीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत तरुणाईने लेझीम नृत्यासह हरिनामाचा जयघोष केला. या वेळी शेकडो ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक वाशिवलीतून फिरून पुन्हा मंदिरात आल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
मंदिराच्या सभामंडपात अधिवास व जलाधिवास, धान्याधिवास विधी करण्यात आले. यानंतर होमहवन करून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या वेळी सामुदायिक हरिपाठ होऊन हभप अॅड. यशोधन महाराज साखरे यांचे हरिकीर्तन झाले. या वेळी कीर्तन ऐकण्यासाठी रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाशिवली ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.